अभियानात रेल्वे स्टेशन, बस डेपो व वर्दळीच्या जागी सखोल स्वच्छता मोहीमा

 

 

नवी मुंबई : दररोज नियमितपणे करण्यात येणा-या स्वच्छतेप्रमाणेच काही दुर्लक्षित जागांची सफाईदेखील विशेष मोहीमेव्दारे करण्यात यावी अशा प्रकारच्या नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या सूचनांनुसार आठही विभागांमध्ये सखोल स्वच्छता मोहीमा (Deep Cleaning) राबविण्यात येत आहेत. यामध्ये नागरिकांना सहभागी करून घेऊन शहरात स्वच्छतेची चळवळ उभी करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे.
या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त  सुनिल पवार आणि घनकचरा व्यवस्थापनाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे व परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली घणसोली विभागात विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त  संजय तायडे यांच्या पुढाकाराने घणसोली रेल्वे स्टेशन व परिसरात विशेष सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
रेल्वे स्टेशन्सच्या स्वच्छतेची जबाबदारी सिडको महामंडळाची असली तरी नवी मुंबईच्या स्वच्छ शहर मानांकनात कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये याकरिता आयुक्त महोदयांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका सखोल स्वच्छता मोहीमेंतर्गत रेल्वे स्टेशन स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत आहे.
या अनुषंगाने घेण्यात आलेल्या घणसोली रेल्वे स्टेशन स्वच्छता मोहीमेत पोलीस प्रशिक्षण घेत असलेले दळवी ॲकेडमीचे होतकरू युवक – युवती सामाजिक बांधिलकीच्या भावनेने सहभागी झाले होते. तसेच राजीव गांधी महाविद्यालयातील एन.एस.एस. चे विद्यार्थी आणि स्वच्छताप्रेमी नागरिकही उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग अधिकारी  संजय तायडे यांच्या समवेत उप मुख्य स्वच्छता अधिकारी  राजेंद्र इंगळे, स्वच्छता अधिकारी  विजय पडघन तसेच स्वच्छता निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतामित्र यांनी विशेष योगदान दिले.
सखोल स्वच्छता मोहीमेंतर्गत विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त  भरत धांडे यांच्या नियंत्रणाखाली तुर्भे येथील पेट्रोल पंपांवरील शौचालय सफाईची विशेष मोहीम स्वच्छता अधिकारी  संजीव रोकडे यांनी स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता मित्रांसह राबविली.
तसेच कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी  सुनिल काठोळे यांनी स्वच्छता अधिकारी राजूसिंग चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता मित्रांच्या सहयोगाने कौपरखैरणे बस डेपोमध्ये सखोल स्वच्छता मोहीम राबविली.
अशा सखोल स्वच्छता मोहीमांव्दारे दुर्लक्षित जागांप्रमाणेच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते अशा ठिकाणांचीही स्वच्छता केली जात आहे.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *