मुंबई : “दोन आमदार घेऊन फिरतोय तरी विधानसभेत घाम फोडल्याशिवाय राहात नाही. शेतकरी, शेत मुजरांच्या प्रश्नावर काम करतोय. आमचे पंधरा ते वीस आमदार आले तर मुख्यमंत्र्याचा गणपती करु, उचलून नेऊन विसर्जन करू, त्यांना उचलून नेऊन समुद्रात बुडवू. त्यासाठी तुमची साथ हवी आहे. आम्हाला तुमचे आशीर्वाद पाहिजेत”, असे अचलपूरचे आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत. ते हिंगोलीमध्ये बोलत होते.

बच्चू कडू म्हणाले, आपली लढाई कष्ट करणाऱ्यांची आहे. एसटीमध्ये ड्रायव्हर असलेल्या व्यक्तीला बार हजार महिना मिळतात आणि कलेक्टरच्या गाडीवर असलेल्या माणसाला पंचवीस हजार रुपये महिना मिळतो. तू एका माणसाला घेऊन जातो तुला पंचेचाळीस हजार मिळतात. आमचा एसटी ड्रायव्हर पन्नास लोकांना घेऊन जातो, त्याला बारा हजार रुपये मिळतात. तुमच्या बापाचं राज्य आहे का? बच्चू कडू अजून जीवंत आहे. या लोकांना उखडून फेकून टाकू. तुमचं बाथरुम पाच लाखांचं आणि आमचं घर सव्वा लाखाचं, तुम्हाला लाज वाटत नाही का? हे कोणी विचारत नाही. घेतली कावड की निघाला. जातीच्या नावावर निवडून येणारे बरेच जण आहेत, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.

तिसऱ्या आघाडीसाठी बच्चू कडूंनी २५ जागांसाठी चाचपणी केली आहे. सरकारकडे आमच्या १८ मागण्या आहेत त्या जर पूर्ण झाल्या तर आम्ही निवडणूकच लढणार नाही. आम्ही जातीय समीकरणे जोडून एकत्र येणार नाही. राजू शेट्टी, मनोज जरांगे, MIM सोबत आमचे जे मुद्दे आहेत त्यावरच एकत्र बसू अन्यथा आम्ही बसणार नाही. वेळ आली तर एकटे लढू. मात्र मुद्द्यांवर ज्या ज्या पक्षाचं एक मत होईल त्यांच्यासोबत आम्ही लढू. आमचे मुद्दे हे सर्व जातीमधील शेतकरी कष्टकरी मजुरांचे आहेत. आम्ही इतके मोठे नाही की प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊ किंवा त्यांच्यासोबत जाऊ. तो त्यांचा विषय आहे, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.

सरकारने निर्णय घेतला तर ठीक अन्यथा आम्ही शेतकरी शेतमजुरांची ताकद महाराष्ट्राला दाखवू. आम्ही किमान २० ते २५ जागांवर लढू जिथे जिथे चांगले उमेदवार मिळत आहेत तिथे आम्ही पुढे जाऊ. आमचा मूळ मुद्दा आहे शेतकऱ्यांचा त्या मुद्द्यावर जर सर्व एकत्र आले तर आम्ही नक्कीच सोबत राहू, अन्यथा नाही, असा इशाराही कडू यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *