ठाणे : भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी हरित-पक्ष अशी सर्वमान्य ओळख असणाऱ्या ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रसिद्धीप्रमुख आणि पत्रकार संजय दळवी यांनी, आपल्या ५०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने, मरणोत्तर अवयवदान केले आहे.
सोमवार, ५ ऑगस्ट रोजी, आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून, ‘नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’ (NOTTO) या केंद्र शासनाच्या अंगीकृत, कार्यरत असलेल्या संस्थेत डोळे, हृदय, फुप्फुस, यकृत आणि किडनी या पाच इंद्रियांची नोंदणी करुन, मरणोत्तर अवयवदान केले आहे. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे काहीतरी देणं लागतो, त्यामुळे सामाजिक ऋणातून उतराई होण्यासाठी, अवयवदानासारखा दुसरा शाश्वत मार्ग नसल्याचे संजय दळवी यांनी, यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे. मरणोत्तर अवयवदानाच्या माध्यमातून किमान दोनजणांना दृष्टी मिळेल, पाचजणांना नवीन आयुष्य मिळेल, यासारखे दुसरे पुण्यकर्म नव्हे. कर्मकांड करण्यापेक्षा, चांगले कर्म हाच खरा ‘धर्म’ असल्याचे संजय दळवी यांनी, यानिमित्ताने आवर्जून नमूद केले. मृत्युनंतर शरीराची राख होऊन ते वाया घालविण्यापेक्षा, मरणोत्तर अवयवदान केल्यास, आपल्यामुळे अनेक आयुष्ये नव्याने सुरु होतील आणि तेच खरे आत्मिक समाधान आपण याक्षणाला अनुभवत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, संजय दळवी यांच्या मरणोत्तर अवयवदानाच्या निर्णयाचे, समाजातील विविध स्तरातून स्वागत होत असून, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, त्यांचे विशेष कौतुक केले आहे. “सर्वसामान्यांचे जीवन आणि निसर्ग-पर्यावरण, हवं एवढ्यासाठीच राजकारण” ही ‘धर्मराज्य पक्षा’ची राजकीय भूमिका असून, याच नैसर्गिक-तत्वाला अनुसरुन, पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता जिवंतपणी आणि मृत्युनंतरही कार्यरत असतो, हेच अवयवदानाच्या माध्यामतून अधिक सुस्पष्ट झाले असून, याचा मला सार्थ असल्याच्या भावना राजन राजे यांनी व्यक्त केल्या आहेत. आपल्या मरणोत्तर अवयवदानाच्या पार्श्वभूमीवर, प्रसिद्धीमध्यामांशी बोलताना संजय दळवी म्हणाले की, मृत्युनंतर विद्युतदाहिनीमध्ये आपल्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत, शिवाय कोणतीही धार्मिक कर्मकांडे करण्यात येऊ नयेत. ‘निसर्गाचे रक्षण आणि पर्यावरणाचे संवर्धन’ यासाठी आपण कटिबद्ध असल्यामुळेच, ज्या निसर्गातून आपल्या जीवनाची सुरुवात झाली आहे, त्याच निसर्गाकडे आपला शेवट व्हावा, जिवंतपणी सामाजिक बांधिलकी जपावी आणि मृत्यूनंतर अवयवदानाच्या माध्यमातून, समाजाच्या ऋणातून मुक्त व्हावे, एवढीच आपली अंतिम इच्छा असल्याचे संजय दळवी यांनी शेवटी म्हटले.
