मुंबई : राज्यात सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या भीतीने मंत्रालयात अधिकारी आणि कार्यकर्ते यांची प्रचंड गर्दी वाढू लागली आहे. आज सकाळी मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्रालयात अचानक लोकांची गर्दी वाढल्याने, पोलिसांची एकच तारांबळ उडाली होती.
आज सकाळी अकरा वाजता मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मंत्रीमंडळाची बैठक होती.त्यामुळे सकाळ पासून अधिकाऱ्यांची वर्दळ सुरु होती. मात्र अचानक दुपार नंतर कार्यकर्ते आणि ग्रामीण भागातून आलेल्या लोकांची गर्दी वाढल्यामुळे पोलिस खात्याची पळापळ सुरू झाली. प्रत्येक एकीकडे मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती. तर दुसरीकडे मंत्री महोदयाना भेटण्याकरिता प्रत्येक मजल्यावर गर्दी दिसत होती.
मंत्रालयातील वातानुकूलित उपहारगृह आणि कर्मचाऱ्यांच्या उपहारगृहात सुद्धा लोकांच्या जेवणासाठी रांगा लागल्या होत्या. त्यामुळे उपहारगृहावर सुद्धा प्रचंड ताण पडला होता.जेवण शिल्लक राहिले नसल्याने अनेकांना उपाशी पोटी राहावे लागले. तसेच मंत्रालयातील दैनंदिन उपहारगृहात जेवायला येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागला.
अनेक मंत्री आपल्या् कार्यालयात न येता परस्पर बंगल्यावर गेल्याने, अनेकांची मंत्री भेटले नसल्याने निराशा झाली.
आज मंत्रालयाबाहेर एक किलोमीटर पर्यत रांग लागली होती. सुमारे साडेसात हजार लोकांनी मंत्रालयात प्रवेश केला असल्याचा अंदाज मंत्रालयात पोलिस सुरक्षा यंत्रणने सांगितला. तर सुमारे पाचशे गाड्यांची ये- जा झाल्याची माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्याने दिली.
पास काढल्यानंतर एक ते दिड तास मंत्रालयात पोहचायला लागत असल्याने नागरिक हैराण झाले होते. त्यामुळे आज दिवस भरात अनेक वेळा पोलिस आणि नागरिक यांच्यात शाब्दिक चकमक उडालेली पहायला मिळाले.
