सीमा सुरक्षा दलातील जवानांना महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली 10 ई-रिक्षाची भेट

मुंबई : दूरवर जिथे नजर जाईल तिथे केवळ वाळवंट आणि समुद्राची एक किनार नजरेस येते…वाळवंट म्हणजे नुसतीच कोरडी रेती नाही, तर पावसाळ्यात गुडघाभर किंवा काही ठिकाणी त्यापेक्षा खोलवर पाय रुततील एवढा चिखल…हिवाळा, उन्हाळ्यात मीठाची चादर ओढावलेल्या वाळवंटात चालताना पायाला चिरा पडून त्यातून भळभळणारे रक्त… यांसारख्या असंख्य कठोर परिस्थितीचा सामना करत भूज येथील सीमेवर भारतीय जवान आपले कर्तव्य बजावत आहेत. महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी या जवानांची ही समस्या लक्षात घेत त्यांना 10  ई रिक्षांची भेट देऊन सीमेबरोबरच आपलं रक्षण करणाऱ्या जवानांप्रती आपली कर्तव्यनिष्ठा व संवेदना दाखवून दिली. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी या ई रिक्षा गुजरातमधील भूज येथे सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात चावी प्रदान करण्यात आल्या.
भारत पाकिस्तानची सीमारेषा म्हणजे सातत्याने डोळ्यात तेल घालून कडा पहारा देणे. भारतातील गुजरात येथील सीमारेषा म्हणजे जमीन आणि पाणी दोन्हींवर सातत्याने पहारा देणे. या जमिनी म्हणजे साध्यासुध्या जमिनी नाहीत, तर आव्हानात्मक असे कच्छ येथील थार रण…हे जगातील सर्वात मोठे पांढरे मीठाचे वाळवंट म्हणून ओळखले जाते. या कच्छच्या रणमध्ये प्रतिकूल परिस्थितीत बीएसएफचे जवान देशाच्या सीमेचं रक्षण करत आहेत. या भागात खडा पहारा देताना खाऱ्या पाण्याची समुद्राची हवा, वाळवंटावर जमा होणारे मीठ, पावसाळ्यात पावसामुळे गुडघाभर साचणारा गाळ, सातत्याने जागा बदलणारे नाले…आदि गोष्टींचा सामना देखील जवानांना करावा लागतो. दूरवर पसरलेल्या वाळवंटात पहारा देताना चिखलात खाली पाय किती खोल जाईल याचा पुढच्या पावलाला भरोसा नसतो. त्यामुळे जवान आधी काठी गाळात रुतवून खोलीचा अंदाज घेऊन वाट काढत असतात. केवळ गाळातून वाट काढायची नाही तर गुडघाभर चिखलात पाय रुतवत शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवणे. वाळवंटात समुद्राच्या भरती, पाऊस आदि गोष्टींमुळे नाल्याचा प्रवाह निर्माण होऊन ते आपली जागा देखील सातत्याने बदलत असतात. या गाळातून चालताना पायात घातलेले बूटही फार कामी येत नाहीत.  त्यावेळी तर हे जवान अनवाणीच सीमेवर पहारा देतात.
बीएसएफच्या जवानांना होणारा त्रास लक्षात घेत हीच  महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी त्यांच्या भैरवनाथ शुगर्स लि. याउद्योग समुहाच्या सीएसआर फंडातून  जवानांना खास 10 ई रिक्षाची भेट दिली आहे. ही वाहने बॅटरीवर चालत असल्याने इंधनाची तर बचत होणारच आहे. व त्या पर्यावरणपूरक आहेत. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या या १० ई रिक्षा जवानांसाठी खूप सोयीच्या ठरल्या आहेत. असे प्रतिपादन कर्नल सिंह यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
१५ ऑगस्ट  स्वातंत्र्यदिनी भुज सेक्टरचे डीआयजी अनंत सिंह यांच्या हस्ते या ई रिक्षा जवानांना प्रदान करण्यात आल्या. यावेळी शिवम चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख डॉ. प्रकाश कुरमी यांसह बीएसएफचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्नल सिंह यांनी स्वतः ही रिक्षा चालवित पाहणी केली. या रिक्षा मिळाल्याने आता गस्त घालण्यासाठी दूरवर चालत जावे लागणार नाही. सामानाची ने आण करण्यासाठी या रिक्षांचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो अशी भावनाही सिंह यांनी व्यक्त केली.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *