उद्धव ठाकरेंकडून स्वप्नीलचे कौतुक
मुंबई: शाब्बास स्वप्नील ! आम्हाला सर्वांना तुझा अभिमान वाटतो. अशा शब्दात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत ब्राँझ मेडल जिंकणाऱ्या कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळेचे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. महाराष्ट्र रायफल असोसिएशनकडून स्वप्नीलचा सत्काराचा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलक होते.
आपण स्वप्नील कुसाळे याला अभिनंदन करण्यासाठी का फोन केला नाही? यामागील कारण सांगिताना मिश्किल कोटी केली. स्वप्नीलने पराक्रम गाजवल्यानंतर, मी अशोक पंडीतजींना फोन केला की, स्वप्नीलचा नंबर मिळेल का? नंबर लगेच मिळाला. फोन फिरवला तेवढ्यात लगेच विचार आला, नको, उद्या पेपरला बातमी यायची, निशाणा धरला, उद्धव ठाकरेंचा फोन आला आणि नेम चुकला. त्यामुळे मी तुला फोन केला नाही”, असा टोला नरेंद्र मोदी यांचा उल्लेक न करता उद्धव ठाकरे यांनी मारल्यावर एकच हशा पिकला. पण, आपण स्वप्नील याच्या मामांना फोन करुन अभिनंदन केल्याचं आणि विचारपूस केल्याचंदेखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मामा अतिशय भारावून बोलत होता. स्वप्नील जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी घरी फोन करुन चौकशी करतो. कितीही मोठं झालं तरी जो आपल्या आई-वडिलांना विसरत नाही तोच कीर्तीची सर्व शिखरं पार करतो”, असं उद्धव ठाकरे स्वप्नीलला उद्देशून म्हणाले.
कुस्तीमध्ये महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी हेलिसिंक ऑलिम्पिकमध्ये भारताला ब्राँझ मेडल जिंकून दिले होते. वैयक्तीक खेळातील भारताचे ते पहिले मेडल ठरले होते. त्यानंतर तब्बल ७२ वर्षांनी महाराष्ट्राचा खेळाडू ऑलिम्पिकचे पदक जिंकू शकलाय.
“ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणं ही काही सोपी गोष्ट नाही. सर्वच पदकचं महत्त्व असतं. पण ऑलिम्पिकच्या पदकाला वेगळा सन्मान असतो. आम्ही तर टीव्हीवर पाहत असतो की, कसे आपले खेळाडू खेळत असतात. या पदकाचं महत्त्व पाहिलं, ऑलिम्पिक जिंकल्यानंतर जगभरातील दिग्गज खेळाडूंच्या भावना वेगळ्या होत्या. मी एकदा विचार केला की, समजा आपण ऑलिम्पिकला गेलो आहे, आणि बंदूक माझ्या हातात आहे, तिथलं सगळं वातावरण, दबाव असताना, अचूक पदक जिंकणं हे खूप महत्त्वाचं आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
