७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : पालघर जिल्ह्यातील तारापूर जवळील रासायनिक कारखान्याचे मालक, पश्चिम उपनगरातील प्रथितयश उद्योजक विजय शंकर केळुसकर यांचे काल रात्री बोरीवली पूर्व येथील एका खासगी रुग्णालयात आकस्मिक निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी अनुराधा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. काही काळापूर्वी त्यांच्या दोन्ही मुलांचे ऐन उमेदीच्या काळात निधन झाल्यामुळे केळुसकर परिवार दुखाच्या छायेतून बाहेर येत नाहीत तोवर कर्ते सवरते उद्योजक विजय केळुसकर काळाच्या पडद्याआड गेले. जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील एकता विनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपनगराचा राजा, मागाठाणे मित्र मंडळ तसेच विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री विजय वैद्य संचालित जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे ते खंदे समर्थक होते. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विजय केळुसकर यांनी बोरीवली येथे येऊन आपला ठसा उमटविला होता. ठाणे, पालघर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात त्यांनी आपल्या मनमिळावू स्वभावामुळे मोठा जनसंपर्क निर्माण केला होता. काल सकाळी प्रकृती बरी वाटत नसल्याने स्वतःच चालत ते इस्पितळात गेले. त्यांना वैद्यकीय तपासण्या केल्या नंतर अती दक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु रात्रीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे जय महाराष्ट्र नगरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी बोरीवली पूर्व येथील दौलतनगर स्मशानभूमित स्व. विजय केळुसकर यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व थरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
