गणेशोत्सव मंडळांनी व्यक्त केले समाधान
नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रात उत्साहाने साजरा होणारा गणेशोत्सव शहराच्या नावलौकिकाला साजेसा पर्यावरणपूरक साजरा व्हावा यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आलेले आहे. याकरिता विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत असून नागरिकांनी शाडूच्या श्रीमूर्तींची प्रतिष्ठापना करावी तसेच सजावटीत पुनर्वापरयोग्य साहित्याचा वापर करावा तसेच श्रीमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करुन नैसर्गिक जलस्त्रोतांचे रक्षण करावे असेही आवाहन करण्यात आलेले आहे. याबाबतची विशेष व्हिडीओ चित्रफितही नागरिकांच्या पसंतीस उतरलेली आहे.
श्रीगणेशोत्सव सुव्यवस्थित पद्धतीने संपन्न व्हावा यादृष्टीने महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली महिन्यापूर्वींच संबधीत प्राधिकरणांची व गणेशोत्सव मंडळांची संयुक्त बैठक संपन्न झालेली असून मंडळांना तत्पुरत्या स्वरुपात मंडप व तत्सम रचना उभारण्याची परवानगी मिळण्याकरीता ई सेवा संगणक प्रणाली उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या परवानगीसाठी महानगरपालिकेमार्फत कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही असे आयुक्त महोदयांनी या बैठकीत जाहीर केले होते.
त्यास अनुसरुन महानगरपालिका क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांकडून प्राप्त अर्जांपैकी सर्व कागदपत्रांची पुर्तता करणा-या 176 मंडळांना परवानगी देण्यात आलेली असून उर्वरित 21 अर्जदारांना अपुरी कागदपत्रे पूर्ण करून लगेच परवानगी प्राप्त करून घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
या प्रणालीव्दारे एकाच ठिकाणी सर्व विभागांकडून परवानगीसाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्रे सादर केल्यानंतर लगेच परवानगी प्राप्त होत असल्याने ही एक खिडकी योजनेसारखी ई सेवा संगणक प्रणाली अत्यंत उपयोगी असल्याचे व परवानगीसाठी विविध कार्यालयात धावाधाव करावी लागत नसल्याबद्दल गणेशोत्सव मंडळांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मंजूरी मिळालेल्या अर्जांमध्ये सर्वाधिक 52 अर्ज कोपरखैरणे विभाग कार्यालयाच्या हद्दीतील असून नेरुळ -27, बेलापूर – 26, ऐरोली – 22, तुर्भे – 19, वाशी – 17, घणसोली – 8 व दिघा – 5 अशा 176 मंडळांचा समावेश आहे. उर्वरीत प्रलंबित अर्जही आजच निकाली काढण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्याकडून देण्यात आले असून त्यानुसार विभाग कार्यालयाकडून कार्यवाही करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे महत्वाची बाब म्हणजे या वर्षी देण्यात आलेली परवानगी पुढील 5 वर्षांसाठी ग्राह्य धरण्यात येणार असून त्यासाठी मंडळांनी दरवर्षी वाहतुक पोलीस, स्थानिक पोलीस व अग्निशमन विभाग यांचे ना हरकत प्रमाणपत्र विभाग कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. आयुक्त महोदयांनी घेतलेला हा निर्णय मंडळांना दिलासा देणार असून त्याचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले आहे.
00000
