फडणवीसांचा सनसनाटी आरोप
लातूर: राज्यातील महायुती सरकार महिलांना मजबूत आणि सक्षम करण्याचे प्रयत्न करत आहे. त्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. मात्र, काही लोक लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात गेले. न्यायालयात जाणारी ही व्यक्ती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची निवडणूक प्रमुख म्हणून काम करते, लाडकी बहीण योजनेत काँग्रेस खोडा घालण्याचे काम करतेय असा सनसनाटी आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते बुधवारी उद्गीर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर जोरदार आगपाखड केली. माझी विरोधकांना विनंती आहे की, त्यांनी लाडकी बहीण योजनेकडे राजकीय चष्म्यातून पाहू नये. या योजनेला विरोध करुन का. ही योजना आपल्या बहिणींसाठी आहे. दिवसभर राबणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा होतात तेव्हा त्यांना त्याचं मोल कळतं. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना या १५०० रुपयांचे मोल कळणार नाही. पण आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली काहीही झालं तरी ही योजना सुरु ठेवू. तुमचा आशीर्वाद पाठीशी आहे तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करु शकणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आम्ही शेतकऱ्यांसाठी वीजबिल माफ केले आहे. तसेच तरुणांसाठी कार्य प्रशिक्षण योजना सुरु करून लाडक्या भावांनाही मदत केली आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
मोदींच्या नेतृत्वात हा देश प्रगती करत आहे. मोदींनी सांगितलं की, महिलांना केंद्र बिंदू मानून योजना आणल्या तरच २०४७ साली विकसित होईल. त्यामुळे लखपती दीदी सारख्या योजना मोदींनी सुरु केल्या. तसेच मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात ‘लेक लाडकी’, ‘लाडकी बहीण’, ‘महिला सशक्तीकरण’, एसटी मध्ये ५०% टक्के सूट अशा योजना सुरु केल्या, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
