स्वाती घोसाळकर

मुंबई- मालवणमधिल शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्यावरून उठलेला वादंग शमतो न शमतो तोच आता शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शोधावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावेळी या वादाच्या केंद्रस्थानी आहेत सरसंघचालक मोहनजी भागवत. रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लोकमान्य टिळकांनी लावला असे वक्तव्य नुकतेच पुण्यात सरसंघचालकांनी केले होते. यावर तीव्र प्रतिक्रीया उमठल्या असून महात्मा ज्योतीबा फुलेंचे श्रेय्य हिरावण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. भाजपच्या नेत्यांनी मात्र या विषयावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

पुण्यात मिलिंद पराडकर याांच्या ‘तंजावरचे मराठे’ या पुस्तकाचं मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी भागवत यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचं श्रेय लोकमान्य टिळकांना दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. शिवाजी महाराजांचं राज्य किती होतं? आज सरकारी महाराष्ट्र आहे, तेवढंही नव्हतं. पण आग्र्याहून परत आल्यावर स्वराज्य येणार हे निश्चित होतं. सर्वांना संघर्ष सापडला. सर्वांना मार्ग सापडला आणि सर्व यशस्वी झाले. शिवाजी महाराज इंग्रजांविरुद्ध लढले. शिवाजी महाराज इथेच होऊन गेले. त्यांचं स्मरण व्हावं आणि जागरण व्हावं म्हणून रायगडावर उत्सव सुरू केला. टिळकांनी ते सर्व शोधून काढलं. वगैरे, वगैरे. रवींद्रनाथ टागोरांनी शिवाजी महाराजांवर कविता लिहिली, असा दावा मोहन भागवत यांनी केला होता.

दरम्यान, इतिहास बघितला तर 1869 मध्ये महात्मा जोतिबा फुले हे विस्मरणात गेलेल्या रायगडावर पहिल्यांदा गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा पुनर्शोध त्यांनी घेतला. समाधीची अवस्था बघून पुण्यात आल्यानंतर अर्वाचीन इतिहासातील सर्वात मोठा पोवाडा देखील महात्मा फुले यांनी लिहिला. शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जिर्णोद्धाराची चळवळ देखील महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केली. लोकमान्य टिळकांचे साथीदार असलेल्या केळकर यांच्या देखील आत्मचरित्रात याचे उल्लेख आढळतात. हा अभ्यास आदरणीय भागवत सरांनी केलेला दिसत नाही. म्हणूनच त्यांच्याकडून अशी वक्तव्य होत आहेत, असा चिमटा इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी काढला.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर प्रतिक्रिया देणे टाळले. मी हे वक्तव्य ऐकले नसल्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी महात्मा ज्योतीराव फुले यांनीच शोधून काढली आहे. हा इतिहास कोणालाही बदलता येणार नाही. शिवजयंती उत्सव सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केला आहे, असं राज्याचे मंत्री आणि अजितदादा गटाचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनीच शोधली. त्यांचं योगदान सर्वांना माहीत आहे. पण या वादात पडू नये. लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले समकालीन होते. दोघांनीही त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांबाबत ज्या भूमिका घेतल्या त्या महत्त्वाच्या होत्या. त्यामुळे या वादात पडू नये. शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. समाधी रायगडावर आहे. त्याचं स्मरण आणि निगा राखली पाहिजे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *