उल्हासनगर : 10-पहिल्यांदाच उल्हासनगर महानगरपालिकेत कार्यरत 2200 कर्मचारी आणि 1800 सेवनिवृत्तांचा पगार हा 31 ऑगस्ट रोजीच करण्यात आला आहे.त्यामुळे ऐन गणेशोत्सवात कर्मचाऱ्यात आनंदाचे वातावरण आहे.  असे असताना शहरातील 2199 दिव्यांगांना त्यांच्या मासिक मानधनापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.स्वप्निल पाटील यांनी केला आहे.

2 सप्टेंबर रोजी आयुक्त पदाचा पदभार स्विकारणारे विकास ढाकणे यांनी गणेशोत्सवात कर्मचाऱ्यांना गावी जावे लागते, त्यांनी घेतलेल्या विविध वस्तूंचे आणि लोणचे हप्ते भरावे लागतात. या दूरदृष्टीचा विचार करून 1 सप्टेंबर रोजीच कर्मचारी आणि सेवानिवृत्त यांचा पगार करण्याचे निर्देश मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे,मुख्यलेखापरिक्षक शरद देशमुख यांना दिले होते.

मात्र 1 सप्टेंबर रोजी सुट्टी असल्याने किरण भिलारे,शरद देशमुख यांनी 31 ऑगस्ट रोजीच कर्मचाऱ्यांच्या व सेवनिवृत्तांच्या खात्यात पगार जमा केला.आयुक्त विकास ढाकणे यांच्यामुळे पहिल्यांदाच दुसऱ्या महिन्याची तारीख येण्यापूर्वीच पगार झाल्याने सर्वच कमालीचे सुखावून गेले.

दिव्यांगांना 2018 पासून एक हजार रुपये मानधन देण्यास सुरुवात झाली.2022 मध्ये दिड हजार रुपये मानधन करण्यात आले.अशातच तत्कालीन आयुक्त डॉ.अझिझ शेख यांनी दिव्यांगांच्या दिड हजार रुपये मानधनात सातशे रुपयांची वाढ करून मानधन 2200 रुपये केले.मात्र कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना गणेशोत्सवात मानधन देण्याबाबत लेटलतीफपणा का करण्यात येत आहे?असा सवाल अ‍ॅड.स्वप्निल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

यासंदर्भात मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे यांच्याशी विचारणा केली असता,दिव्यांग कल्याणकारी विभागाकडून बिल आले नसल्याचे सांगितले.दिव्यांग विभागप्रमुख राजेश घनघाव यांच्याशी संपर्क साधला असता,दर महिन्याला वेळेत दिव्यांगांच्या खात्यात मानधन जमा होते.पण दिव्यांग विभागातील लिपिकाची निवडणुकीच्या कामासाठी तहसील कार्यालयात बदली झाल्याने मानधनाचे बिल काढता आले नाही.

लिपिकाला पालिकेत पाठवण्याची विनंती करण्यात आली असून ते येताच मानधनाचे बिल तात्काळ काढून मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती राजेश घनघाव यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *