स्थानिक भूमिपुत्र दुसऱ्या क्रमांकावर
ठाणे : विधानसभेची निवडणूक जाहीर होताच सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. या निवडणुकीतील लढत थेट महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार असली तरी ओवळा- माजिवडा विधानसभेत मात्र निवडणुकीचे चित्र वेगळे दिसण्याची शक्यता आहे. या मतदारसंघांत पहिल्या क्रमांकाचा मतदार उत्तर भारतीय असल्याने त्याची मते ज्यांच्या पारड्यात पडतील त्या उमेदवाराला विजयाची खात्री असणार आहे.
ओवळा- माजिवडा हा मतदारसंघ ठाण्यापासून थेट भाईंदरपर्यंत पोहोचला आहे. सध्या या मतदारसंघात शिवसेनेचे प्रताप सरनाईक आमदार आहेत. येथे निवडून येण्याची त्यांची तिसरी टर्म आहे. ते दोन्ही वेळा निवडून आले तेव्हा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ होती; मात्र आताचे चित्र वेगळे आहे. शिवसेनेत फूट पडल्याने दोन शिवसेना अर्थात दोन शिवसेनेचे उमेदवार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच या मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात नव्या इमारती उभ्या राहिल्याने त्यामध्ये बहुतांश मतदार ठाण्याबाहेरून येथे राहायला आला आहे. परिणामी, स्थानिक भूमिपुत्र मतदारांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर आली आहे.
परराज्यातून येथे वास्तव्याला आलेल्यांची संख्या वाढली असून ती ७० टक्क्यांवर पोहोचली आहे. ही संख्या सुमारे तीन लाख एवढी झाली आहे. त्यात उत्तर भारतीयांसह मारवाडी, गुजराती, दक्षिण भारतीय अशा परप्रांतीयांचा समावेश आहे. एकूण मतदारांची संख्या पाच लाख ४० हजार २९३ आहे. तर, नव्या मतदारांची संख्या ११,७५४ हजारांवर पोहोचली आहे. यावरून या मतदारसंघावर परराज्यातील मतदारांचा कब्जा आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यानंतर दुसरा क्रमांक आगरी मतदारांचा लागतो. तिसऱ्या क्रमांकावर अनुसूचित जाती-जमातीमधील मतदारांचे येथे वास्तव्य आहे. अशा परिस्थितीमुळे या मतदारसंघातील बरेचसे चित्र उमेदवार कोणत्या राज्यातील आहे, त्यावर अवलंबून असण्याची शक्यता आहे.
महायुतीचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून उत्तर भारतीय अथवा इतर राज्यातील उमेदवार उभा केला तर ही निवडणूक महायुतीच्या उमेदवाराला टक्कर देणारी ठरणार आहे. येथे राहणाऱ्या उत्तर भारतातल्या भाजपप्रेमी मतदाराने प्रांतानुसार मतदान करण्याचा निर्णय घेतला तर तो महायुतीला मारक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासोबतच काशिमीरा येथे नव्याने वसलेल्या काशिगाव झोपडपट्टीत मतदारसुद्धा या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावताना दिसणार आहे. मुंबई आणि इतर ठिकाणांहून बाधित झालेले नागरिक येथे वसले आहेत. त्यामध्ये बहुतांश मतदार दक्षिण भारतातील आहेत. त्यांनी या मतदारसंघात मतदानाच्या नावांची नोंदणी करून घेतलेली आहे. हा मतदारसुद्धा चेहरा पाहून मतदान करण्याची चिन्हे आहेत.
सरनाईकांचे पारडे जड
शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक येथून २००९ ते २०१९ असे सलग तिसऱ्यांदा येथून निवडून आले आहेत. २००९ मध्ये ते ९०४१ मतांच्या फरकाने निवडून आले होते. त्यांनी या निवडणुकीत ३६.०३ टक्के मते मिळवली होती. यावेळी एकूण १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते; तर २०१४ मध्ये हा फरक १०,९०६ एवढा होता. यावेळी त्यांना ३६.७५ टक्के मते मिळाली होती. यावेळी एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. तर, २०१९ मध्ये मात्र सरनाईक मोठ्या फरकाने निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा तब्बल ८४,००८ मतांनी पराभव केला होता. काँग्रेसच्या उमेदवाराला ३३,५८५ मते मिळाली होती, तर सरनाईक यांना १,१७,५९३ मते मिळाली होती. या वेळीसुद्धा १४ उमेदवार रिंगणात होते.
