मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
मुंबई : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर महाविकास आघाडीतील तणाव निवळला आहे. मुंबईत शिवसेनेला तर नागपुरात काँग्रेसला झुकते माप मिळेल या निकषावर तडजोड झाली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. थोरात यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर महाविकास आघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. महाविकास आघाडीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस १०५ ते 108 जागांवर निवडणूक लढेल. तर, शिवसेना ठाकरे गटाला ९० ते ९५ जागा तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ८० ते ८५ जागा देण्यात येणार असून मीत्र पक्षांसाठीही ५ ते ६ जागा सोडण्यात आल्या आहेत.
बाळासाहेब थोरांत यांच्या मध्यस्तीनंतर ठाकरे आणि काँग्रेसनं सामंजस्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसार, महाविकास आघाडीतील मुंबईच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून मुंबईत ठाकरेंची शिवेसनाच मोठा भाऊ आहे. मुंबईत महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा ठाकरे गट लढवणार असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला १८ जागा देण्यात आल्या आहेत तर, काँग्रेस १४ जागांवर निवडणूक लढेल. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत अणुशक्ती नगर आणि घाटकोपर या केवळ 2 जागा मिळणार आहेत. दरम्यान, मुंबईतील वर्सोवा, भायखळा आणि वांद्रे पुर्व या तीन जागांवर ठाकरे गट आणि कांग्रेसमध्ये अजुनही अंतिम तोडगा निघायचा बाकी आहे.
शेकापकडून पाच उमेदवार जाहीर
रायगड : विदर्भातील काही जागांवरून अद्याप ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच सुरू असतानाच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने ५ उमेदवार जाहीर केले आहेत. शेतकरी कामगार पक्षाने अलिबाग, पेण, उरण, पनवेल आणि सांगोला येथील उमेदवार जाहीर केले. त्यात अलिबागमधून चित्रलेखा पाटील, पेणमधून अतुल म्हात्रे, उरण प्रीतम म्हात्रे, पनवेल बाळाराम पाटील, सांगोला बाबासाहेब देशमुख यांना तिकीट देण्यात आले आहे. आम्ही महाविकास आघाडीत आहोत, दिलेला शब्द बदललेला नाही असं विधानही उमेदवारांची घोषणा करताना जयंत पाटील यांनी केले आहे. अलिबाग येथील शेतकरी भवनात आज शेकापची बैठक झाली. त्यात ५ उमेदवारांचा निर्णय घेण्यात आला.
सांगोला येथील जागा सोडण्यास ठाकरे गटाने नकार दिला आहे. इतकेच नाही तर या जागेवर इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दीपक आबा साळुंखे यांना ठाकरेंनी त्यांच्या पक्षात प्रवेश दिला. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून दीपक साळुंखे रिंगणात असतील असं बोललं जाते. त्यामुळे नाराज शेतकरी कामगार पक्षाने सांगोलासह इतर ४ ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत.
