मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कालिंघम यांच्याकडे धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांची मागणी
अनिल ठाणेकर
ठाणे : अमलीपदार्थ विक्री आणि त्याचा व्यवसाय अथवा वितरण करणाऱ्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी कठोर पाऊले उचलावीत, अशी आग्रही मागणी ‘धर्मराज्य पक्षा’चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कालिंघम यांना केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून, भारतात अमलीपदार्थांचा वापर मोठ्याप्रमाणात होताना दिसत आहे. देशभर पसरणारा व्यसनांच्या अजगराचा हा विळखा, तातडीने सोडविला गेला नाही तर, संपूर्ण तरुणपिढी आणि या देशाचं भवितव्य हा अजगर गिळंकृत करेल आणि व्यसनाधीन झालेल्या बेरोजगार तरुणांना गुलाम व गुन्हेगार बनण्यास किंवा बनविण्यास फार काळ लागणार नाही. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची आणि उर्वरित महाराष्ट्राची परिस्थिती काही वेगळी नाही, किंबहुना अत्यंत चिंताजनक स्थिती या पुरोगामी राज्याची झालेली आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात अमलीपदार्थाचे सेवन करुन, एका तरुणीवर अत्याचाराची घटना घडल्याने, अमलीपदार्थाचा मुद्दा ‘उडता पंजाब’च्या धर्तीवर, पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला असून, मुंबई-पुणे, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांतच नव्हे; तर, महाराष्ट्रातील छोटी शहरे व ग्रामीण भागांतदेखील अमलीपदार्थाच्या व्यवसायाने आपले जाळे भक्कमपणे विणायला सुरुवात केलेली आहे. अमलीपदार्थ सेवनाच्या माध्यमातून, मुंबई-महाराष्ट्रासह, संपूर्ण देशभरात गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ झाल्याच्या घटना सर्रास पाहायला मिळत आहेत. परिणामी, अमलीपदार्थांच्या व्यसनांचे प्रमाण, दिवसेंदिवस अधिकच उग्ररुप धारण करताना दिसत आहे. याचा प्रतिकूल परिणाम, आगामी विधानसभा निवडणुकीवर होण्याची दाट शक्यता असल्याने, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कालिंघम यांना पत्र पाठवून, याप्रकरणी त्रिस्तरीय चौकशी समिती नेमण्याची करण्यात आली आहे. दरम्यान,* उपलब्ध गुन्ह्यांच्या (एफआरआय) आकडेवाडीनुसार, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्ये अमलीपदार्थाच्या सेवनात आघाडीवर आहेत. चिंताजनक बाब म्हणजे, मुंबई शहर हे, अमलीपदार्थाच्या सेवनात पहिल्या क्रमांकावर आहे. ही बाब प्रगत आणि पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रासाठी प्रचंड लाजिरवाणी आहे. राज्यातील तरुणपिढी अमलीपदार्थाच्या विळख्यात पुरती गुरफटून गेल्याचेच यातून अधोरेखित होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हे प्रकरण अतिशय गंभीर आणि संवेदनशील बनलेले आहे. कारण, अमलीपदार्थाच्या पूर्णपणे आहारी गेलेल्या तरुणांना, काही गुन्हेगारी प्रवृत्तीची राजकीय मंडळी, आपल्या चुकीच्या कृत्यांसाठी या तरुणपिढीचा वापर करुन घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा मतदानावर विपरीत परिणाम होऊ शकतो. एकीकडे ऐन दिवाळीच्या तोंडावर, आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी, अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ उपस्थित नसल्यामुळे, अन्नप्रक्रिया करणाऱ्या आस्थापनांची तपासणी थंडावली आहे; तर, दुसरीकडे मात्र, अमलीपदार्थविरोधी पथकाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असतानाही, अवघ्या महाराष्ट्रभरात, अमलीपदार्थांचा बेसुमार वापर वाढीस लागून, व्यसनाधीनता मोठ्याप्रमाणात वाढलेली आहे. याच पार्श्वभूमीवर, या संपूर्ण देशविघातक कृत्यांची चौकशी करण्यासाठी, एक त्रिस्तरीय समिती नेमण्यात येऊन, अमलीपदार्थ विक्री आणि त्याचा व्यवसाय अथवा वितरण करणाऱ्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी कठोर पाऊले उचलावीत, अशी आग्रही मागणी ‘धर्मराज्य पक्षा’चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, आपल्या पत्रातून राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.
