नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविले जात असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पथनाटयासारख्या लोकप्रिय माध्यमाचा आयुक्त्‍ डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी वापर करण्यात येत आहे. मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा लोकशाहीने दिलेला अधिकार असून तो कर्तव्य समजून बजावावा याकरिता पथनाटयातून प्रबोधन करण्यात येत आहे. यामध्ये 6 कलावंतांचा समुह महानगरपालिका क्षेत्रात वर्दळीच्या ठिकाणी जाऊन सोबत असलेली वादय वाजवत लोकांना एकत्र करत असून त्यानंतर आपल्या “मतदार राजा जागा हो” पथनाटयाचे सादरीकरण करत आहे.

रविवारी सार्वजनिक सुट्टीचा दिवस लक्षात घेऊन नागरिक कुटुंबासमवेत एकत्रितपणे फिरायला बाहेर पडतात हे लक्षात घेऊन पथनाटय समुहाने ऐरोली विभागात गणेश तलावाजवळ तसेच ऐरोली रेल्वे स्टेशन परिसर आणि सेक्टर 5 येथील मध्यवर्ती चौक याठिकाणी पथनाटयाचे सादरीकरण केले. यावेळी पथनाटय पाहण्यासाठी थांबलेल्या  उपस्थित नागरिकांसमवेत पथनाटय झाल्यानंतर “मतदार प्रतिज्ञा” घेण्यात आली व नागरिकांना 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

यापुढील काळात अशाच प्रकारे महापालिका क्षेत्रात विविध विभागांमध्ये नागरिक मोठया संख्येने एकत्र येत असतात अशा ठिकाणी पथनाटयांचे सादरीकरण करुन मतदानाचे महत्व पटवून दिले जात आहे तसेच मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *