अनिल ठाणेकर
ठाणे : २६ जानेवारी-२०२५ रोजी, भारताच्या अमृतमहोत्सवी-प्रजासत्ताकदिनी, रात्री ठीक ९ वाजता फक्त, पाच मिनिटांसाठी आपापल्या घरातील अथवा इतर ठिकाणचे लाईट्स बंद ठेवून, ईव्हीएमचा प्रतिकात्मक तीव्र निषेध व्यक्त करण्याचे आवाहन ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी केले आहे.यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित, पक्षप्रवक्ते समीर चव्हाण, पक्षाचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष तसेच, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजप व त्यांची ‘महायुती’ (एनडीए) सत्तेवर आल्यानंतर, भारतीय जनतेचा ईव्हीएम वरील विश्वास उडत गेला व आजमितीस तो पूर्णतया उडाल्यानेच, पुन्हा ‘कागदी-मतपत्रिकेवरील’ मतदानाची मागणी भारतभरातून व्हायला लागलीय…त्याच अनुरोधाने धर्मराज्य पक्ष, या ईव्हीएम हटाव… लोकतंत्र बचाव मोहिमेत हिरिरीने उतरला असून, “आगामी सर्व प्रकारच्या निवडणुका यापुढे ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेद्वारेच घेण्यात याव्यात” यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, १० डिसेंबरपासून ‘विश्वमानव-दिवस’ किंवा ‘जागतिक मानवी-हक्क दिना’चं औचित्य साधत निवडणूक-प्रक्रियेसंबंधाने ईव्हीएम हवे की, बॅलेट पेपर अशी ठाणेकरांची ‘जनमत-चाचणी’ मोहीम सुरु करण्यात आलेली असून, ठाणे शहराच्या काही भागात प्रायोगिकस्तरावर, ही ‘जनमत-चाचणी मोहीम’ यापुढेही राबविण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी, वर्तकनगर नाका, येथे गुरुवारी, ठाणे जनता सहकारी बँक, खोपट नाका, ठाणे (प) येथे जनमत-चाचणी घेण्यात आली. दरम्यान, “नो बॅलेट पेपर… नो इलेक्शन” ही ‘धर्मराज्य पक्षा’ची घोषणा असून, मतपत्रिकेवरील मतदानाचा पारदर्शक लोकशाही-प्रजासत्ताकाचा हक्क पुन्हा मिळवण्यासाठी. येत्या २६ जानेवारी – २०२५ रोजी, प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे निमित्त साधून ठीक ९ वाजता फक्त, पाच मिनिटांसाठी सर्वांनी आपल्या घरातले अथवा कार्यालयातले लाईट्स बंद ठेवून ‘ईव्हीएम’वरील मतदानाचा तीव्र निषेध व्यक्त करण्याचे आवाहन राजन राजे यांनी केले आहे.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *