मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना विजयाकडे घोडदौड करीत असताना लालबाग परळने ठाकरे बंधूंना हात दिला. लालबाग-परळच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंचाच भगवा फडकल्याचं पाहायला मिळाले. गिरणगावचा गड ठाकरे बंधूंनी राखला. गिरण गावातील सातपैकी सहा जागांवर ठाकरे बंधूंचा विजय झाला, तर एका जागेवर समाजवादी पक्षाचा विजय झाला. श्रद्धा जाधव, पेडणेकर,   किरण तावडे यांच्यासह ठाकरे बंधूंच्या युतीच्या सहा उमेदवारांनी विजय मिळवला. मुंबई शिवसेनेची आणि शिवसेना मुंबईची ही बाळासाहेब ठाकरेंची टॅगलाईन असायची. यात उद्धव ठाकरेंनी मुंबईतील शिवसेना ही ठाकरेंचीच हे दाखवून दिले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर खरी शिवसेना कुणाची, असाप्रश्न निर्माण झाला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिला असला, तरी हा लढा सुप्रीम कोर्टात अद्यापही सुरु आहे. मात्र मुंबईकरांनी ठाकरे बंधूंना पसंती दिल्याचे या निकालाने पाहायला मिळाले.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या २८ जागांच्या तुलनेत उद्धव ठाकरेंना दुप्पटीहून अधिक ६६ जागा मिळाल्या आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीने ठाकरे समर्थक मतांची एकजूट झाली, तरीही एकनाथ शिंदेंनी वेगळी चूल मांडल्यामुळे मराठी मतांचे काही प्रमाणात विभाजन झाल्याचे बोलले जाते. मात्र तरीही भाजपनंतर ठाकरेंची शिवसेना ही मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे. तर एकनाथ शिंदेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ६६ आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे २८ नगरसेवकांची मुंबईतील एकत्रित शिवसेनेची ९४ ही बेरीज भाजपापेक्षा अधिक आहे. मनसे आणि शिवसेना जशी एकत्र आली तशी भविष्यात ठाकरे बंधू आणि शिंदे एकत्र येतील का ? असा सवाल राजकीय वर्तुळात हलक्या आवाजात विचारला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *