तानसा अभयारण्यात मद्यपी टोळक्यांचा उच्छाद
जंगलात शेकडो दारूच्या बाटल्या, प्लास्टिक कचऱ्याचे ढीग; वन्यप्राण्यांचे आरोग्य धोक्यात
वन्यजीव विभाग, पोलीस व महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
अविनाश उबाळे
ठाणे : तानसा वन्यजीव अभयारण्यातील संरक्षित जंगल व तानसा जलाशय परिसरात पर्यटनाच्या नावाखाली बेकायदेशीरपणे येणाऱ्या मद्यपी टोळक्यांकडून सर्रास दारूच्या पार्ट्या झोडल्या जात असून, त्यातून निर्माण होणारा कचरा जंगलात बेदरकारपणे फेकला जात आहे. दारूच्या काचेच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे, माचिस, प्लास्टिकच्या बाटल्या, पत्रावळ्या, ग्लास व पिशव्या यांचे ढीग संपूर्ण परिसरात साचले असून, त्यामुळे तीव्र दुर्गंधी पसरली आहे. या कचऱ्यामुळे अभयारण्यातील वन्यप्राण्यांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले असून, वन्यजीवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, तानसा तलाव व अभयारण्य परिसरात मद्यपी टोळक्यांकडून खुलेआम पार्ट्या सुरू असताना वन्यजीव विभाग, पोलीस प्रशासन व मुंबई महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणांकडून कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
गेल्या आठवड्यात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त स्थानिक श्रमजीवी संघटनेने राबवलेल्या स्वच्छता अभियानात तानसा जंगल व धरण परिसरातून शेकडो दारूच्या रिकाम्या बाटल्या व प्रचंड प्रमाणात प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. या मोहिमेमुळे अभयारण्यात सुरू असलेला मद्यपी पर्यटकांचा संतापजनक प्रकार उजेडात आला. साठलेले कचऱ्याचे ढीग व शेकडो दारूच्या बाटल्या पाहता, मद्यपी पर्यटकांना स्थानिक पोलीस, वन्यजीव विभाग व महापालिका सुरक्षा यंत्रणेची कोणतीही भीती उरलेली नसल्याचे स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
तानसा अभयारण्यात समृद्ध वन्यजीव अधिवास
राज्य सरकारच्या वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या सुमारे ३२० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या तानसा वन्यजीव अभयारण्यात बिबट्या, सांबर, चितळ, काकर, चौशिंगा, भेकर, रानडुक्कर, कोल्हा, हरिण, तरस, ससे, माकडे आदी वन्यप्राणी मुक्तपणे संचार करतात. अशा संवेदनशील परिसरात मद्यपी पर्यटकांकडून टाकल्या जाणाऱ्या कुजलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीला रोज वन्यप्राण्यांना सामोरे जावे लागत असून, त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.
जंगलात निर्माण झालेल्या या अनधिकृत ‘डम्पिंग ग्राउंड’मुळे वन्यजीवांची घुसमट होत असल्याचे मत वन्यजीव संरक्षण प्रेमींनी व्यक्त केले आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या प्रकरणी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तानसा वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक डी. बी. मिसाळ यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
श्रमजीवी संघटनेचे स्वच्छता अभियान
श्रमजीवी संघटनेतर्फे राबविण्यात आलेल्या भव्य स्वच्छता मोहिमेत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. समाजात स्वच्छता, पर्यावरण संरक्षण व सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
अघई विभागातील जंगल परिसर तसेच तानसा अभयारण्य व धरणाच्या आसपास मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या व प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची योग्य ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.
