मुंबईत पाणी बाणी
तब्बल ४४ तास पाणीपुरवठा बंद
मुंबई : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा. मेट्रोच्या कामामुळे मुंबईत तब्बल ४४ तास पाणीबाणी असणार आहे. मेट्रोच्या या कामामुळे मुंबईकरांना पुढील काही दिवस उकळलेले आणि फिल्टर केलेले पाणी प्यावे लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ‘मेट्रो 7अ’ प्रकल्पासाठी ४०० मिमी व्यासाच्या अप्पर वैतरणा जलवाहिनीचा काही भाग वळवण्यात आलाय. परिणामी वळवलेल्या जलवाहिनीला पूर्व विभागाशी जोडण्याचे काम सुरू केले जाणार आहे. यासाठी हा पाणीपुरवठ खंडीत होणार आहे.
दरम्यान, मंगळवार, २० जानेवारी ते २२ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत दादर, प्रभादेवी, माहीम, धारावी, अंधेरी पूर्व, विक्रोळी, भांडुप, वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पश्चिमेकडील अनेक भागात हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. बीएमसीच्या जी नॉर्थ, के पूर्व, एस, एच पूर्व आणि एन विभागातील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत होणार काही भागात पाणीपुरवठा कमी होईल. तर नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळा देखील बदलल्या जाणार आहे. महानगरपालिका प्रशासनाने बाधित भागातील रहिवाशांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आणि पाणी वाचवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. तर मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व विभागात क्रॉस-कनेक्शनचे काम केले जाईल. हे काम मंगळवार ते गुरुवार एकूण ४४ तास सुरू राहील. या भागात पाणीपुरवठा प्रभावित होईल. असेही प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.
