निवडणूक प्रक्रियेत घोळ
पराभूत उमेदवार प्रजासत्ताक दिनी करणार अर्धनग्न उपोषण
अनिल ठाणेकर
ठाणे: नुकत्याच झालेल्या ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत सदोष यंत्रणा वापरून मतदान प्रक्रियेत घोळ घातला आहे, असा आरोप करीत नव्याने निवडणूक घ्यावी, या मागणीसाठी अपक्ष उमेदवार रवींद्र चांगो शिंदे हे प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न उपोषण करणार आहेत. या संदर्भात त्यांनी राज्य निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार केला आहे.
ठाणे महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक १५ मधून रवींद्र शिंदे यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र, हा पराभव सदोष प्रक्रियेतून झाल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. रवींद्र शिंदे यांनी राज्य निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात झालेले मतदान आणि मतमोजणी यामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही निवडणूक नियमबाह्य झाली असल्याने ही निवडणूक रद्द करून फेरमतदान घ्यावे. तसेच, निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली होती. मात्र, त्यावर आयोगाने कार्यवाही न केल्याने प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, या उपोषणादरम्यान, असंविधानिक पॅनल पद्धती रद्द करावी, व्हीव्हीपॅट सुविधा सुरू करावी अथवा मतपत्रिकेवर मतदान घ्यावे, जिथे बिनविरोध प्रक्रिया राबविली आहे; त्या ठिकाणी माघार घेणाऱ्यांची चौकशी करावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे, असे रवींद्र शिंदे यांनी सांगितले.
