मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहिर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका दोन दिवसांनी पुढे ढकलल्या आहेत. त्यानुसार ५ फेब्रुवार रोजी होणारे मतदान आता ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर मतमोजणीची तारीखही आता ९ फेब्रुवारी करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी १३ जानेवारी २०२६ रोजी सविस्तर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, निवडणूक चिन्ह वाटप तसेच अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे अद्याप शिल्लक आहेत.
या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ नंतर फक्त दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली होती. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया १४ फेब्रुवारीच्या आत पूर्ण करणे आवश्यक होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने मतदान आणि मतमोजणीच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
