सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून कोकणात जाणारे त्र्यंबकेश्वरपासून गडहिंग्लजपर्यंत अनेक घाट रस्ते आहेत. त्यापैकी मुंबई-पुण्यादरम्यानचा बोरघाटातील रस्ता हा अतिशय महत्त्वाचा आहे. जुन्या मुंबई-पुणे रस्त्याला द्रुतगती मार्गाचा पर्याय दिला असला, तरी बोरघाटात हे रस्ते एकाच ठिकाणी मिळतात. घाटातील मिसिंग लिंकच्या कामाला वारंवार मुदतवाढ देऊनही ते काम अद्याप अपूर्णच आहे. गेल्या आठवड्यात या रस्त्यावरची वाहतूक तब्बल ३२ तास थांबून राहिल्याने नागरिकांचे जे हाल झाले त्याला पारावारच राहिला नव्हता. नाशिक-मुंबई रस्त्याला आता ‘समुद्धी’चा पर्याय असला, तरी मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या महानगरांना जोडणाऱ्या तसेच मुंबई-दक्षिण भारतादरम्यानच्या बोरघाटातील रस्त्याला अजूनही पर्याय देण्यात सरकारला यश आलेले नाही.
मुंबई–पुणे हा रस्ता महाराष्ट्राचा आर्थिक, औद्योगिक आणि शैक्षणिक जीवनवाहिनी मानला जातो. दररोज लाखो प्रवासी, शेकडो मालवाहतूक गाड्या आणि हजारो खासगी वाहने या मार्गावरून प्रवास करतात; मात्र या ‘जीवनवाहिनी’च्या मध्यावर असलेला बोरघाट आज राज्यातील सर्वात मोठ्या वाहतूक समस्यांपैकी एक बनला आहे. दर आठवड्याच्या वीकेंड तसेच सुट्ट्याच्या काळात या रस्त्यावरून प्रचंड वाहतूक होत असते. एखादा अपघात झाला, की संपूर्ण रस्त्याचा श्वास कोंडतो. राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना बाळासाहेब ठाकरे यांनी या रस्त्याच्या कामाकडे नितीन गडकरी यांचे लक्ष वेधले. जुन्या पुणे-मुंबई रस्त्याला पर्याय म्हणून मुंबई-पुणे द्रुतगती रस्ता तयार झाला. आता या रस्त्याला तीन दशके होतील. तीन दशकांत या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या तीनशे टक्क्यांनी वाढली; परंतु या रस्त्याचे रुंदीकरण आणि त्याला पर्यायी मार्ग काढण्यात सरकारला अपयश आले आहे. तीन दशकानंतरही या रस्त्यावरून टोल वसुली सुरू आहे; परंतु रस्त्याच्या डागडुजीपलीकडे फार काही काम होत नाही. मुंबई-पुणे अंतर कमी करणाऱ्या आणि प्रवासाच्या वेळेत अर्धा तासांनी बचत करणाऱ्या मिसिंग लिंकचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही हे काम होत नाही. पावसाळ्यात, अपघातांच्या वेळी किंवा सुट्ट्यांच्या काळात येथे निर्माण होणारी प्रचंड वाहतूक कोंडी ही प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या आठवड्यात वायू वाहतूक करणारा कंटेनर रस्त्यात आडवा झाल्याने ३२ तासांहून अधिक काळ तिथे वाहतूक ठप्प झाली होती. हा वायू धोकादायक असल्याने वास्तविक लगेच दोन्ही टोलनाक्यावरून या रस्त्यावरची वाहतूक बंद करता आली असती. पोलिसांनी नंतर दिलेल्या पर्यायी रस्त्याचा वापर अगोदरच करता आला असता; परंतु महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व टोलवसुली करणाऱ्या ठेकेदार संस्थेला ते सुचले नाही. रस्त्यात मध्येच अडकलेल्यांना कुठेही अन्न, पाणी मिळाले नाही. नैसर्गिक विधीसाठी नागरिकांची ३२ तासांहून अधिक काळ कुचंबना झाली. पोलिस व काही नागरिकांनी वाहतूक कोंडीत अडकलेल्यांना पाणी आणि अन्न दिले; परंतु लाखो लोक अडकले असताना ही मदत तुटपुंजी होती. वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका उद्योजकाने हेलिकॉप्टर मागवून सुटका करून घेतली; परंतु लाखो लोकांतील एकाचेच ते भाग्य असते.
बोरघाट हा सह्याद्री पर्वतरांगांमधील अरुंद आणि वळणावळणाचा घाटमार्ग आहे. पूर्वी हा मार्ग तुलनेने कमी वाहतुकीसाठी बांधला गेला होता; मात्र, मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग सुरू झाल्यानंतर आणि औद्योगिकीकरण वाढल्यानंतर या परिसरावर वाहतुकीचा प्रचंड ताण पडला आहे. चार लेनचा हा मार्ग आता सहा-आठ लेनचा करण्याची भाषा होत असली, तरी वाहतूक कोंडीवर तो उपाय नाही. आपत्कालीन प्रसंगी बोरघाटाला पर्यायी जवळच दुसरा घाट रस्ता असायला हवा. बोरघाटातील वाहतूक कोंडीने सरकारच्या डोळ्यांत अंजन घातले गेले. जड वाहने, कंटेनर ट्रक, बस, कार आणि दुचाकींची गर्दी यामुळे घाटात सतत संथगतीने वाहतूक सुरू असते. चढ-उतार, तीव्र वळणे आणि मर्यादित दृश्यमानता यामुळे अपघातांची शक्यताही वाढते. बोरघाटातील कोंडीचे सर्वात मोठे कारण म्हणजे अपघात आणि वाहनांचे तांत्रिक बिघाड. एखादा ट्रक उलटला, ब्रेक फेल झाला किंवा इंजिन बंद पडले, तरी संपूर्ण मार्ग ठप्प होतो. अनेक वेळा ही कोंडी दोन ते तीन तासांपर्यंत टिकते. यामागे वाहनांची खराब देखभाल, ओव्हरलोडिंग, चालकांचा निष्काळजीपणा आणि वेगमर्यादेचे उल्लंघन ही प्रमुख कारणे आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी जड वाहनांची संख्या वाढल्याने समस्या अधिक तीव्र होते. पावसाळ्यात बोरघाटातील परिस्थिती अधिकच बिकट होते. दरडी कोसळणे, रस्त्यावर पाणी साचणे, धुक्यामुळे कमी दृश्यमानता आणि रस्त्यावरील खड्डे यामुळे वाहतूक संथ होते. अनेकदा लहानशा दरडीमुळेही संपूर्ण मार्ग बंद पडतो. हवामान बदलामुळे अतिवृष्टीच्या घटना वाढत असल्याने भविष्यात ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडीच्या वेळी प्रशासनाची प्रतिक्रिया अनेकदा संथ आणि अपुरी ठरते. क्रेन, टोईंग व्हॅन, रुग्णवाहिका आणि वाहतूक पोलिस वेळेवर पोहोचत नाहीत. पर्यायी मार्गांची माहिती प्रवाशांना तत्काळ मिळत नाही. तसेच, सीसीटीव्ही, सेन्सर, डिजिटल सूचना फलक यांचा वापर अद्यापही अपुरा आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतरच उपाययोजना केल्या जातात.
जड आणि अवजड वाहनांसाठी ठराविक वेळ निश्चित करणे गरजेचे आहे. पीक अवर्समध्ये ट्रक प्रवेशास मर्यादा घालणे कोंडी कमी करू शकते. ‘एआय’आधारित वाहतूक नियंत्रण प्रणाली, रिअल-टाइम मॉनिटरिंग, मोबाइल अॅप्स आणि डिजिटल साईन बोर्डच्या माध्यमातून प्रवाशांना तत्काळ माहिती देणे आवश्यक आहे. प्रत्येक काही किलोमीटरवर क्रेन, टोईंग व्हॅन आणि आपत्कालीन पथक कायमस्वरूपी उपलब्ध असावे. अपघातानंतर १५ मिनिटांत कारवाई सुरू होईल, अशी यंत्रणा उभी करावी. जड वाहन चालकांसाठी विशेष प्रशिक्षण, आरोग्य तपासणी आणि कडक दंडात्मक कारवाई लागू करणे गरजेचे आहे. वेगमर्यादा काटेकोरपणे राबवावी. नवीन बोगदे, उड्डाणपूल, एलिव्हेटेड रोड आणि मल्टी-लेन विस्तार यासारख्या दीर्घकालीन प्रकल्पांना गती देणे आवश्यक आहे. बोरघाटातील वाहतूक कोंडी ही केवळ तांत्रिक समस्या नाही, तर प्रशासनाची इच्छाशक्ती, नियोजनाचा अभाव आणि अंमलबजावणीतील ढिलाई यांचे प्रतीक आहे. मुंबई–पुणे मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा मापदंड आहे. तोच जर वारंवार ठप्प होत असेल, तर विकासाच्या गतीला ब्रेक लागणे अपरिहार्य आहे. या महामार्गाला पर्यायी मार्ग म्हणून शिरूर-चाकण-तळेगाव-कर्जत हा १३५ किलोमीटरचा पर्यायी मार्ग तातडीने हाती घेणे आवश्यक आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर पुणे-मुंबई रस्त्यावरची चाकण, पिंपरी, भोसरी, रांजणगावकडून येणारी वाहतूक पर्यायी रस्त्याने नेणे शक्य आहे. सध्या मुंबई–पुणे मार्गावरून दररोज लाखो वाहने प्रवास करतात. खासगी गाड्या, जड मालवाहू ट्रक, पर्यटन बस आणि दुचाकी यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी, बोरघाट हा ‘बॉटलनेक’ बनला आहे. एखादा अपघात, वाहन बिघाड किंवा पावसामुळे दरड कोसळली, तरी संपूर्ण वाहतूक ठप्प होते. या स्थितीत एकाच मार्गावर अवलंबून राहणे म्हणजे विराट साला धोका निर्माण करणे होय. म्हणूनच चाकण–तळेगाव–कर्जतसारख्या समांतर मार्गाची आवश्यकता गरजेची ठरते. चाकण-तळेगाव (पुणे जिल्हा) आणि कर्जत (रायगड) या तीन महत्त्वाच्या भागांना जोडणारा हा मार्ग प्रत्यक्षात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा एक नवा दुवा ठरू शकतो.
राही भिडे
