वैद्यकीय उपकरणांच्या उद्योगाला कृत्रिम बुद्धिमत्तेने घेरले आहे त्यामुळे आता शस्त्रक्रिया कक्षात नजर टाकली तर कृत्रिम बुद्धिमत्तेने चालणारी अनेक उपकरणे आढळतील. या उपकरणांच्यामुळे शस्त्रक्रिया अधिक अचूक होतात असे मानले जात असले तरी आता अशीही माहिती मिळते की ही उपकरणे रुग्णांना बरे करण्याऐवजी त्याना इजा करीत आहेत. ही बाब आरोग्यविषयक तज्ञांनीच समोर आणली आहे हे महत्वाचे आहे. कारण या बाबतीत रुग्ण अथवा त्याच्या नातेवाईकांना माहिती असणे सर्वसाधारणपणे शक्यच नसते.
अशाच एका आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेल्या उपकरणाचा उपयोग नाकामधील ‘सायनस’ची पोकळी वाढविण्यासाठी केला जात असल्याची बातमी एका जागतिक वृत्तसंस्थेने प्रसारित केली आहे. ही पोकळी वाढविण्यासाठी हे यंत्र एक फुगा नाकात सोडते असे म्हटले गेले. परंतु हे उपकरण उपयोगात आल्यापासून याबद्दलच्या अनेक तक्रारी अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासनाकडे पोचल्या. त्यापैकी काहींना इजा झाल्याचे समोर आले. असे दिसते की या शस्त्रक्रियेनंतर एका रोग्याच्या नाकातून चक्क कवटीच्या क्षेत्रातील द्रव बाहेर येऊ लागला होता. ज्यांनी असे उपचार घेतले त्यापैकी काही म्हणाले की त्यांना मेंदूच्या विकाराचा झटका आल्यासारखा अनुभव आला.
या यंत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ उपकरण रोग्याच्या डोक्यातील योग्य जागी पोचले आहे हे दाखवण्याचे काम करते असे उपकरण निर्मात्याचे म्हणणे असून त्यातील ‘सॉफ्टवेअर’ आता अधिक अचूक झाले आहे. बातमीत म्हटले आहे की ही दुरुस्ती करण्यापूर्वी उपकरण सुरक्षित होते असे काही डॉक्टरांचे मत आहे.
हे प्रकरण आता न्यायालयात दाखल झाले असून कंपनीला या प्रकाराचे कल्पना असायला हवी होती असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. त्यामुळे हे उपकरण विसंगत, चुकीचे असून विश्वासपात्र तर नक्कीच नाही असेही अर्जात म्हटले आहे. उपकरण केवळ ८० टक्के तयार असताना कंपनीने ते बाजारात आणण्याची घाई केली असाही आरोप आहे.
कंपनीचा प्रतिवाद असा आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित त्यांच्या उपकरणाचा यात संबंध असेल अशी घटना घडल्याचा अथवा रुग्णांना इजा होण्याचा पुरावा दिसत नाही. जागतिक पातळीवर लोकांनी याबद्दल जागरूक राहून विचार करायला हवा आहे. कारण इस्पितळातील शस्त्रक्रिया कक्ष हे हळूहळू पण निश्चितपणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आहारी जाऊ लागले आहेत. आरोग्य क्षेत्रातील हा कल अगदी बहु भाषा प्रारूप येण्याच्या अगोदरपासून सुरु होताच परंतु त्या काळात तो पडद्यावर शस्त्रक्रियेचे प्रत्यक्ष चित्र दाखवण्यापुरता असायचा. आज तर डॉक्टरमंडळी केवळ स्क्रीनवरून यत्रचालन करीत असताना दिसतात आणि त्यांच्या अनुभवाबद्दल मुळीच शंका घेता येणार नाही.
या प्रकारानंतर केल्या गेलेल्या एका संशोधन अभ्यासात तर असे दिसले की हृदय विकाराच्या एकूण १२ हजार रुग्णांमधील अनेक रुग्णांना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘स्टेथॉस्कोप’ ने हृदय बंद पडले आहे असे दाखवले होते. याच बुद्धिमत्तेने तयार केलेले ‘गप्पिष्ट’ अर्थात ‘चॅटबॉट’ यांनीही खऱ्या जगातील रुग्णांना आरोग्यासंबंधी सल्ला देणे सुरु केले आहे अशीही बातमी आहेच. एकूण काय तर सावध रहा…
श्याम तारे
प्रसन्न फीचर्स
