पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यानंतर मंत्रिमंडळाचा होणार विस्तार
स्वाती घोसाळकर
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येत्या १७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या मुंबई दौऱ्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात खांदेपालट होणार आहे. महायुतीच्या भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षात खांदेपालट होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची सुत्रे सुनेत्रा पवार यांनी हाती घेतली असून संघटनेवर पकड मजबूत करण्यासाठी मंत्रिमंडळात बदल केला जाणार आहे.
तर, शिवसेनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा निवडणुकीपासून ते पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश-अपयश लक्षात घेऊन पक्षात नव्याने बांधणी केली जाणार आहे. मंत्रिमंडळ स्थापन करताना एकनाथ शिंदे यंनी अडीच वर्षानंतर बदल करण्याचे सुतोवाच केले होते. पण नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि महानगर पालिका निवडणूकीतील निकालामुळे शिंदे काही मंत्र्यांवर नाराज आहेत. त्यांना मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करून पक्षकार्यासाठी पाठविण्यात येईल.
कोकण पश्चिम महाराष्ट्र सोडला तर इतर जिल्ह्यातील मंत्र्यांना झालेल्या निवडणुकांमध्ये फारशी चांगली कामगिरी केलेली नाही.
भाजपामध्येही काही बदल अपेक्षित आहेत. काही मंत्र्यांच्या कार्यपध्दीतवर हायकमांड नाराज असल्याचीही चर्चा आहे. वर्षभरातील मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन आवश्यक तेथे बदल भाजपामध्ये अपेक्षित आहे.
