शिवकालीन इतिहासाचा जागर आणि ‘शिव शंभू गाथा’च्या गजराने दुमदुमले ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय
अनिल ठाणेकर
ठाणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिवजयंती उत्सव २०२६’ अत्यंत उत्साहात आणि भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. “निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू” या उक्तीप्रमाणे महाराजांच्या आदर्श प्रशासकीय आणि शौर्यशाली वारशाचे स्मरण या निमित्ताने करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि शिवगर्जना देऊन महोत्सवाचा प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेली भव्य पदयात्रा सकाळी ८:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून निघाली. केंद्र सरकारच्या ‘माय भारत, मेरा युवा भारत’ या उपक्रमांतर्गत आयोजित या पदयात्रेतून शिवरायांनी दाखवून दिलेल्या सुशासन आणि राष्ट्रनिर्माणाच्या आदर्शांचा जागर करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात आणि भगव्या ध्वजांच्या उपस्थितीत ही रथयात्रा ठाणे शहरातून मार्गक्रमण करीत पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. यादरम्यान तलाव पाळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने नियोजन भवन प्रांगणात ‘अश्वमेध प्रतिष्ठान इंटक ठाणे चॅप्टर’ यांच्या सौजन्याने शिवकालीन शस्त्रास्त्रांचे आणि वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी या प्रदर्शनातील प्रत्येक वस्तूची बारकाईने माहिती घेतली आणि या ऐतिहासिक ठेव्याचे जतन केल्याबद्दल अश्वमेध प्रतिष्ठानचे कौतुक केले. या प्रदर्शनामुळे उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांना प्रत्यक्ष शिवकालीन युद्धनीती आणि साहित्याचा अनुभव घेता आला.नियोजन भवन येथे पार पडलेल्या मुख्य सांस्कृतिक सोहळ्यात ‘शिव शंभू गाथा’ या टीमने आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणाने उपस्थितांना इतिहासात नेले. पोवाडे, गोंधळ, जागरण आणि विविध शौर्यगीतांच्या माध्यमातून शिवरायांच्या जीवनपटातील महत्त्वाचे प्रसंग जिवंत करण्यात आले. सादरीकरणातील जिवंतपणा पाहून उपस्थित अधिकारी आणि नागरिक भारावून गेले होते. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य केवळ युद्धापुरते मर्यादित नसून ते एक उत्तम व्यवस्थापक आणि रयतेचे राजे होते. आज आपण शॉर्ट नोटीसवर आणि काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचे नूतनीकरण सुरू असतानाही नियोजन हॉलमध्ये इतका सुंदर कार्यक्रम करू शकलो, हे टीम वर्कचे यश आहे. शाहीर आणि कलाकारांनी मांडलेला अफजलखान वध आणि शाहिस्तेखानाची फजिती हे प्रसंग बघताना जुन्या आठवणी ताज्या झाल्या.या प्रेरणादायी सोहळ्यासाठी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सर्जेराव म्हस्के पाटील, शशिकांत गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर व उर्मिला पाटील, पोलीस उपआयुक्त (वाहतूक विभाग) पंकज शिरसाठ, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले, तहसिलदार सचिन चौधर, रेवण लेंभे, संदीप थोरात, उमेश पाटील, अमोल कदम, प्रदीप कुडाळ, नायब तहसिलदार दत्तात्रय बेर्डे, तालुका क्रीडा अधिकारी सायली जाधव, लेखाधिकारी उमेश कुमावत, जिल्हाधिकारी महोदयांचे स्वीय सहायक गिरीश काळे, सागर यादव तसेच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसह भारत स्काऊट, गाईड, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी चे विद्यार्थी, विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, पोलीस दल आणि ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले.कार्यक्रमाची सांगता शिवगर्जना आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने करण्यात आली.
