अरे बापरे! भाजपातही बंडखोरी झाली
भिवंडीत भाजपा बंडखोराला काँग्रेसने महापौर केला
स्वाती घोसाळकर
भिवंडी : भारतात २०१४ नंतर राजकारणाचा पट बदलून टाकणाऱ्या भाजपाला भिवंडीत मात्र काँग्रेसने जोरदार झटका दिला. शिवसेनेत फुट पाडून एकनाथ शिंदेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याची घटना महाराष्ट्रात ताजी असतानाच काँग्रेसने त्याचा रंगीत ट्रेलर भिवंडीत दाखविला. भाजपाचे बंडखोर नगरसेवक नारयण चौधरी यांना पाठींबा देत त्यांना महापौर पदी निवडून आणले आणि क्राँग्रसचे तारीक मोमीनही उपमहापौरपदी निवडून आले. भिवंडीतील हा सत्तासंघर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरला. २०१४ नंतर भाजपात फक्त इनकमिंग सुरु होते. पण चौधऱींच्या निमित्ताने भाजपाला पहिल्यांदाच असा झटका बसला आहे. बंडखोर चौधरींवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे.
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेची महापौरपदाची निवडणुकी सुरुवातीपासूनच नाट्यमय ठरली होती. या निवडणुकीत भाजपा बंडखोर नारायण चौधरी यांना एकूण ४८ नगरसेवकांनी पाठिंबा दिला. भाजपमध्ये बंडखोरी करून त्यांनी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या मदतीने हा आकडा गाठला. दुसरीकडे, भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना अवघी १६मते मिळाली आहेत. भाजपाची सहा मते फुटली. तर एकनाथ शिंदे यांनी पाठींबा दिलेल्या कोणार्क आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांना २५ मते मिळाली.
भाजपने सुरुवातीला नारायण चौधरी यांचे नाव महापौरपदासाठी निश्चित केले होते. त्यांनी अर्ज भरल्यानंतर भाजपाने ऐनवेळी स्नेहा पाटील यांना उमेदवारी जाहीर करत अर्ज भरायला लावला. पक्षाच्या या अनपेक्षित निर्णयामुळे चौधरी गट प्रचंड नाराज झाला. चौधरी यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त करत ८ इतर नगरसेवकांसह भाजपपासून अंतर राखले होते. महापौरपदासाठी भाजपचेबंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांना मतदान करण्याचे आदेश काँग्रेसने दिले होते. काँग्रेसकडे ३० मते होती तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) १२ मते होती. या मतांच्या जोरावर नारायण चौधरी यांनी ४८ मते मिळवत महापौरपद काबीज केले.
खरंतर भाजपाची २२ आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची १२ मते एकत्रित पकडली असती तर ९० जागांच्या या महापालिकेत भाजपाला महापौरपद काबीज करणे इतर छोट्यापक्षांच्या मदतीने सहज शक्य होते. पण या निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दोन्ही उमेदवारांचे अर्ज मागे घेत कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांना पाठींबा दिला. पाठींबा दिल्याने लढत तिरंगी झाली. आणि त्यात काँग्रेसने बाजी मारली.
कोणार्कचे मयुरेश पाटील यांचे सूचक व शिंदेसेनेचे जावेददळवी यांचे अनुमोदक म्हणून समाजवादी पक्षाच्या प्रभाग ८ क च्या नगरसेविका शबाना अंसारी या दोघांना सूचक व अनुमोदक राहिल्याने छाननी प्रक्रियेत मयुरेश पाटील यांचा उपमहापौर पदाचे नामनिर्देशन पत्र पीठासीन अधिकारी यांनी अवैध ठरवला.
यामुळे अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांना काँग्रेस, शरद पवार गट आणि भाजपच्या सहा नगरसेवकांनी मतदान केले. यामुळे चौधरी यांचा ४८ मतांनी विजय झाला. शिंदेंच्या सेनेने शेवटच्या क्षणी डाव टाकला पण, भाजपचे सहा नगरसेवक फुटल्याने चौधरी यांना अनपेक्षित पाठबळ मिळाले आणि अखेर ते विजयी ठरले.
