निलेश राणे यांच्या आश्वासनानंतर तळाशील ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित…!
मालवण :  कालावल खाडीपात्रात शेलटी  जेटी ते सर्जेकोट बंदर परिसरात वाळू उपसा होणार नाही असा शब्द शिंदे सेनेचे स्थानिक आमदार निलेश राणे यांनी दिल्यानंतर तळाशील  येथील ग्रामस्थांनी आपले आंदोलन स्थगित केले. तळाशील येथे गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर आणि त्यांना आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. राणे यांचे सोबत यावेळी शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, नायब तहसीलदार प्रिया हरणे,तळशील ग्राम विकास समितीचे अध्यक्ष संजय केळुसकर पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर पतन विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पट्ट्यात यापुढे वाळू उपसा करण्यास परवानगी मिळणार नाही तसेच आंदोलकांच्या अन्य मागण्यांवर लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन ही राणे यांनी यावेळी दिले. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सरकार हे तळाशील ग्रामस्थांच्या सोबतच असून ग्रामस्थांनी मनात कोणतीही शंका बाळगू नये असेही राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
तळाशील गावासमोरील कालावल खाडीतील बेकायदा वाळू उपशावर कारवाई होऊन तो बंद व्हावा यासह अन्य मागण्यासाठी तळाशील ग्रामस्थांनी गेले आठ दिवस कालावल खडीपात्रात  होड्यांमध्ये बसून,तसेच पाण्यात उतरून आंदोलन छेडले होते. गावातील महिला तर चक्क चार तास पाण्यात उतरल्या होत्या. या दरम्यान दोन महिलांची  प्रकृतीही  बिघडली.तेव्हा कुठे असंवेदनशील प्रशासनाला खडबडून जाग आली.अखेर आमदार निलेश राणे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्तक्षेपानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलक  आणि आमदार निलेश राणे यांना बैठकीसाठी पाचारण केले.
अखेर सिंधुदुर्गनगरीतील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आमदार निलेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आंदोलनकर्त्यांशी  तासभर चर्चा केल्यानंतर त्यावर सर्वमान्य तोडगा काढण्यात आला. बैठकीनंतर  ठरल्याप्रमाणे आमदार राणे यांनी सायंकाळी तळाशील गावाला  भेट देत संपूर्ण परिसराची पहाणी केली. स्थानिक ग्रामस्थ आणि आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आणि वरील आश्वासन दिल्यानंतर  आंदोलन मागे घेण्यात आले.
गेले आठवडा भर हे आंदोलन सुरु आहे मात्र निद्रिस्त महसूल प्रशासन काही हलेना. मालवणच्या नायब तहसिलदार सोडल्या तर महसूल विभागाचा एकही बडा अधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी फिरकला नाही.तरीही आंदोलन शांतपणे सुरु होते मात्र प्रशासन दाद फिर्याद घेत नाही असे लक्षात येताच संतप्त ग्रामस्थ आणि खास करून महिला, चक्क खाडी पात्रात उतरल्या आणि आम्ही स्वतःला संपवू असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला.
त्यानंतर  जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी तळाशील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष संजय केळूसकर यांना काल घाईघाईने पत्र पाठवले आणि या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी त्यांना व आंदोलनकर्त्यांना  चर्चेला बोलावले.स्थानिक आमदार या नात्याने निलेश राणे यांनाही आमंत्रित करण्यात आले.
बैठकीला केळुसकर यांच्यासह अजित केणी, संजय जुवाटकर, सीताराम तोडणेकर, गोपाळ मालवणकर, स्नेहा तोंडवळकर आदी आंदोलनकर्त्यांचे  प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार राणी म्हणाले, या प्रश्नावर आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि आणि त्यावर सर्वमान्य तोडगा काढण्याचे ठरले लवकरच या संदर्भात योग्य ते निर्णय घेण्यात येतील. तळाशील आणि आसपासच्या परिसरातील गावांचे अनेक प्रश्न आहेत मग ते ‘सीआरझेड ‘संबंधी असोत, अनधिकृत बांधकामे, वाळू उपसा, किनाऱ्याची धूप होणे. या सर्व प्रश्नांवर सर्व संबंधित विभागांशी  चर्चा करून तोडगा काढण्यात येईल असेही  राणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *