एक अजरामर “आशा”
राजेंद्र हुंजे
आशा भोसले यांचा प्रवास म्हणजे फक्त यशाची कहाणी नाही…
तो संघर्षातून उभं राहण्याचा, स्वतःची ओळख निर्माण करण्याचा आणि प्रत्येक वेदनेला सुरांत रूपांतरित करण्याचा प्रवास आहे.
त्यांच्या प्रत्येक गाण्यात त्यांचं आयुष्य दडलेलं आहे…
प्रत्येक शब्दात एक अनुभव, प्रत्येक सुरात एक भावना…
म्हणूनच, त्या केवळ गायिका नाहीत… त्या एक भावना आहेत… एक युग आहेत… एक “आशा” आहेत. मराठी आणि हिंदी संगीतविश्वात अनेक आवाज आले, अनेक गेले… पण काही स्वर असे असतात, जे काळाच्या पलीकडे जाऊन इतिहासात कोरले जातात. आशा भोसले हे नाव म्हणजे असा एक स्वर, जो केवळ गात नाही, तर आयुष्य जगतो, प्रत्येक वेदना, प्रत्येक आनंद आणि प्रत्येक संघर्ष आपल्या सुरांत साठवतो.
कधी हसवणारा, कधी एकटेपणात साथ देणारा असा एक स्वर… तब्बल सात दशकं आपल्या सोबत राहिला. आज तो स्वर कायमचा शांत झाला आहे. हजारो गाण्यांमधून आत्मा ओतणाऱ्या त्यांच्या ९२ वर्षांच्या अद्भुत प्रवासाची आज स्मृतींच्या खिडकीतून उजळणी होते आहे.
८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली येथे जन्मलेल्या आशाजी या पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या लाडक्या कन्या. संगीताला ईश्वर मानणाऱ्या घरातून त्यांची वाटचाल सुरू झाली. अवघ्या दहा वर्षांच्या वयात ‘माझा बाळ’ या चित्रपटातून सुरू झालेला प्रवास, हा संघर्ष आणि यश यांची अनकथित कहाणी ठरला. १९४८ मध्ये ‘सावन आया’ या पहिल्या एकल गाण्याने स्वरांची पहिली चाहूल दिली आणि ‘रात की रानी’सारख्या चित्रपटांतून त्यांचा आवाज घुमू लागला. कोणाला ठाऊक होतं की, हा एक असा युगप्रवर्तक आरंभ आहे, जो शतकानुशतकं अमर राहील.
पिढ्या बदलल्या, संगीताची शैली बदलली… पण आशाजींचा स्वर कधीच फिका पडला नाही. आज संगीतविश्वातील एक सुवर्ण अध्याय संपला आहे, पण त्यांच्या आवाजाची परंपरा आपल्या हृदयात सदैव जिवंत राहील.
आशाताई, तुमच्या हातच्या मटार पोह्यांना मी कायमचा पोरका झालो…या पोस्टसोबत जोडलेल्या फोटोत मी थोडा तुमच्यापासून अंतर ठेवून उभा राहून फोटो घेत होतो…त्यातही आईसारख्या मायेने तुम्ही माझा हात पकडून स्वतःकडे ओढलं…आणि लाजतो काय म्हणत हा फोटो काढलात तोही तुमच्या कॅमेऱ्यात….😭😭😭
आणि त्याचक्षणी माझ्या आईला फोन लावयला सांगितला…त्यावर तुम्ही मी किती अवखळ, खट्याळ, मस्तीखोर आहे याचा पाढा वाचत, तुम्हाला मी घरी येऊन किती त्रास देतो, या सगळ्या तक्रारींची आईकडे जणू सरबत्तीच केली. तेवढं सगळं सांगून झाल्यावर…तुमच्यातल्या मिश्किल स्वभावाप्रमाणे असं काही नाही हं!!! तुमचा मुलगा फारच गुणी आहे, असं म्हणून आईला माझ्या शाबासकीचं प्रशस्तीपत्र दिलंत….हा क्षण मी माझ्या हृदयाच्या कुपीत कस्तुरीसारखा जपून ठेवलाय…काल पासून लिहिण्याचा प्रयत्न करतोय, पण लेखणी धजावत नव्हती…
आशाताई, तुम्ही अमर आहात तुमच्या स्वरांमधून…
आशाताईंची मी घेतलेली एक मुलाखत संध्याकाळी इथेच पोस्ट करणार आहे…आता पोस्टसोबत त्याची झलक जोडली आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *