‘सॉल्व्हन्ट एक्सट्रॅकर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (एसईए)च्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताची खाद्यतेल आयात तीन टक्क्यांनी वाढून 166.51 लाख टनांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, या वाढीमागे नेपाळकडून होणाऱ्या शुल्कमुक्त आयातीत झालेली मोठी वाढ हे प्रमुख कारण मानले जात आहे.
दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र अर्थात ‘साफ्टा’ कराराअंतर्गत नेपाळला भारतीय बाजारपेठेत शून्य शुल्कात प्रवेश मिळतो. याचाच फायदा घेत नेपाळने यंदा भारताला 7.36 लाख टन खाद्यतेल निर्यात केले. ते मागील वर्षाच्या तुलनेत दुपटीहून अधिक आहे. यात परिष्कृत सोयाबीन तेलासोबत सूर्यफूल तेल, पामोलिन आणि रेपसीड तेलाचाही समावेश आहे. ही वाढ भारतासाठी दोन वास्तव समोर आणते. पहिले म्हणजे देशातील खाद्यतेलाची वाढती मागणी आणि दुसरे म्हणजे देशांतर्गत उत्पादनातील मर्यादा. भारत आजही आपल्या एकूण खाद्यतेल गरजेपैकी केवळ सुमारे 40 टक्के गरज देशांतर्गत उत्पादनातून भागवू शकतो. उर्वरित गरज भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून रहावे लागते.
‘एसईए’च्या मते, कमी उत्पादकता, तुकड्यात विभागलेली शेती, मर्यादित सिंचन सुविधा आणि गहू-तांदूळ पिकांकडे असलेला धोरणात्मक कल यामुळे तेलबिया उत्पादन वाढीला अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी, भारताला आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतींच्या चढ-उताराचा थेट फटका बसतो. यंदा जागतिक बाजारातील वाढलेल्या किमती आणि रुपयाच्या घसरणीमुळे आयात खर्चातही वाढ झाली आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मूल्यवर्धित परिष्कृत तेलांच्या आयातीचा. जर भारताने कच्च्या तेलाऐवजी मोठ्या प्रमाणावर परिष्कृत तेल आयात केले, तर देशांतर्गत रिफायनिंग उद्योगावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दीर्घकालीन दृष्टीने ही बाब चिंताजनक मानली जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच खाद्यतेलाचा संयमित वापर करण्याचे आवाहन केले होते. त्यामागे आरोग्याचा मुद्दा असला, तरी त्याचबरोबर आयात अवलंबित्व कमी करण्याचाही हेतू आहे. कारण भारत जितका अधिक आयातीवर अवलंबून राहील, तितका परकीय चलन साठ्यावर दबाव वाढत जाईल. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांच्या मते, देशाने तेलबिया उत्पादन वाढवणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतकऱ्यांना प्रोत्साहन आणि मूल्यसाखळी मजबूत करणे यावर भर देणे आवश्यक आहे.
खाद्यतेल क्षेत्रातील आत्मनिर्भरता ही केवळ आर्थिक गरज नाही, तर भविष्यातील अन्नसुरक्षेसाठीही अत्यंत महत्त्वाची आहे.
