कल्याण : संत निरंकारी मिशनच्या विद्यमाने २३ व २४ मे रोजी विलेपार्ले स्थित धनजीभाई मेहता ग्राउंडमध्ये निरंकारी राजमाताजी मेमोरियल महिला क्रिकेट टूर्नामेंटचे यशस्वी आयोजन करण्यात आले. त्यामध्ये मुंबई परिक्षेत्रातील एकंदर २२ पैकी १८ सेक्टरमधील महिला क्रिकेट संघांनी उत्साहाने भाग घेतला.
सेमीफाइनलमध्ये सेक्टर-३ व सेक्टर-२१ तसेच सेक्टर-९ व सेक्टर-१८ यांच्यामध्ये सामने झाले ज्यातून फाइनलसाठी सेक्टर-१८ (नेरुळ) व सेक्टर-२१ पवार नगर (ठाणे) यांची अंतिम फेरीत निवड झाली. अंतिम सामन्यात नेरुळची टीम विजेता ठरली तर ठाणे येथील टीमला उपविजेता घोषित करण्यात आले.
निरंकारी मिशन अशा आयोजनांच्या माध्यमातून युवावर्गाच्या ऊर्जेला सकारात्मक दिशा देण्याबरोबरच महिलांच्या सशक्तीकरणालाही चालना देत आले आहे. निरंकारी राजमाता कुलवंत कौरजी यांचे प्रेरणादायी जीवन धैर्य, साहस, सहनशीलता, आध्यात्मिकता व विनम्रता यांचा आदर्श राहिले आहे. त्यांच्याच स्मृतिप्रित्यर्थ या टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले. टूर्नामेंटमध्ये खेळाडूंनी जय-पराजयाच्या पलीकडे जाऊन खिलाडू वृत्ती, प्रेम व सौहार्द यांचा सुंदर परिचय दिला. सामन्यांच्या दरम्यान उत्तम प्रदर्शनाच्या वेळी दोन्ही बाजुच्या टीम खेळाडूंचा उत्साह वाढवताना दिसत होत्या. प्रत्येक मॅचच्या शेवटी खेळाडूंनी एकमेकांचा आदर सन्मानही केला.
समापन सत्रामध्ये स्थानिक सेक्टर संयोजक जयप्रकाश उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण समारोह आयोजित करण्यात आला. त्यामध्ये विजेता-उपविजेता टीमना ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या. भगिनी सुदीक्षा गायकरला “वुमन ऑफ द सीरीज़”, “बेस्ट बैटर” व “बेस्ट बॉलर” आदि पुरस्कार मिळाले. या टूर्नामेंटचे यशस्वी आयोजन करण्यामध्ये स्पोर्टस् कमिटीचे प्रभारी बलिराम कासारे, मनोज सिंह कोटाल व अन्य सेवादार महात्मांनी विशेष योगदान दिले.
००००००००००
