अशोक गायकवाड
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणाची पाणी पातळी आज ७१.५. मीटर इतकी असून १५.७४ टक्के जलसाठा वापरण्यायोग्य आहे. हा जलसाठा जुलै अखेरपर्यंत पुरवठा करता येईल इतका आहे. मात्र आसपासच्या शहरांमधील पाणी टंचाईची भीषण परि‍स्थिती लक्षात घेता तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावेळी पावसाचे प्रमाण कमी आहे हे लक्षात घेता नवी मुंबईकरांनी पाण्याचा अत्यंत काळजीपूर्वक वापर करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करीत नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी आपल्याकडून पाण्याचा कोणत्याही प्रकारे अपव्यय होणार नाही याची प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने काळजी घ्यावी असे आवाहन केले. दोन दिवसाच्या शटडाऊनमध्ये जलवाहिन्या कोरड्या झाल्याने त्यांच्या आतील भागात खाली बसलेला बारीक गाळ पाणीपुरवठा पूर्ववत सुरु झाल्यानंतर जलकुंभापर्यंत आला व गढुळ पाण्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या. या अनुषंगाने महानगरपालिका पाणी पुरवठा विभागामार्फत शहराच्या विविध भागामध्ये मोठया प्रमाणात जलतपासणी मोहीम हाती घेण्यात आली. त्याचप्रमाणे महापौर, उपमहापौर यांचे समवेत नगरसेवकांनीही विविध विभागांमध्ये जाऊन जलतपासणी चाचणीची पाहणी करण्यास सुरुवात केली. या पाहणीमध्ये आंतरराष्ट्रीय आयएसआय मानकानुसार पाणी नमुन्यातील पीएच, टिडीएस, टर्बिडिटी व क्लोरिनचे प्रमाण तपासण्यात आले. या ठिकठिकाणच्या तपासणीमध्ये पाणी पिण्यायोग्य असल्याचे आढळून आले. तरीही नागरिकांना आपल्या घरातील पाणी दूषित असल्याची शंका असल्यास तक्रार करण्यासाठी १८००२२२३०९ हा टोल फ्री विनामूल्य क्रमांक जाहीर करण्यात आला. आता तक्रारींचे प्रमाण अत्यंत कमी झाले असून पाणी पूर्वीसारखे स्वच्छ मिळू लागले आहे. तरीही काही ठिकाणी जलवाहिन्यांमध्ये लिकेजेस असल्याने नळाव्दारे मिळणारे पाणी गढूळ असल्यास लिकेजेस शोधून ते त्वरीत दुरुस्त करुन घेण्याचे निर्देश महापौर सुजाता पाटील यांनी आजच्या तुर्भे, वाशी भागातील पाणी नमुने तपासणी विशेष मोहिमेच्या पाहणी प्रसंगी दिले. यावेळी उपमहापौर दशरथ भगत, क प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश मोरे व ड प्रभाग समिती अध्यक्ष शैला पाटील, नगरसेवक शशिकांत राऊत, दयावती शेवाळे, शशिकला पाटील, अंजली वाळुंज, सुनिल कुरकुटे, शशिकला औटी, शिल्पा ठाकूर, प्रिती भगत तसेच अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता शंकर जाधव व संतोष उनवणे व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी महापौर महोदयांनी तुर्भे से. येथील मलप्रक्रिया केंद्र व टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टचीही पाहणी केली. याप्रसंगी विशेषत्वाने गावठाण भागातील जलवाहिन्या जुन्या झाल्या असल्याने त्यामध्ये मोठया प्रमाणात लिकेजेस असल्याचे सांगत नगरसेवकांनी त्या वाहिन्या बदलण्याची गरज असल्याचे सांगितले. काही नागरिकांनी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली १०% पाणी कपात ही सध्या सगळीकडे जाणवत असलेली पाण्याची कमतरता लक्षात घेता २० % पर्यंत करावी अशी सूचना केली. त्याचप्रमाणे काही नागरिकांकडून अशा पाणी टंचाईच्या काळातही नवी मुंबईत मुबलक पाणी मिळत असल्याने गाडया धुण्यासाठी पाईप लावून पाण्याचा अनाठायी वापर करत असल्याचे निदर्शनास येत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी अशीही मागणी याप्रसंगी उपस्थित नागरिकांकडून करण्यात आली. यावेळी मोठया कालावधीसाठी शटडाऊन घेण्यात आल्याने पाणी गढूळ असण्याच्या तक्रारी अधिक प्रमाणात आल्या. आता पाण्याची स्थिती जवळजवळ पूर्ववत झाल्याचे आढळून येत असून महानगरपालिकेमार्फत पाण्याच्या चाचण्या सुरुच ठेवल्या जाणार आहेत.
00000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *