पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्यासह दुभाजक रंगविणे व वृक्षारोपणावर भर
सुनिल इंगळे
उल्हासनगर : शहरातील एमएमआरडीए अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते बांधकाम प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पावसाळ्यापूर्वी सर्व प्रलंबित कामांना गती देऊन ती दर्जेदारपणे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीत रस्ते बांधकामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेताना आमदार आयलानी यांनी बहुतांश कामे मे महिन्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असतानाही अनेक ठिकाणी ती अपूर्ण असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगत त्यांनी अनावश्यक विलंब झाल्यास संबंधित कंत्राटदारांवर कारवाईचा इशाराही दिला.
रस्ते बांधकामाच्या गुणवत्तेवर विशेष भर देत, ज्या ठिकाणी काम मानकांनुसार झालेले नाही, त्या भागांची पुनर्बांधणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सार्वजनिक निधीतून राबविण्यात येणाऱ्या विकासकामांमध्ये कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
टिल्सन मार्केट परिसरातील पावसाळी पाणी निचरा व्यवस्थेबाबत महापालिकेचे अभियंता संदीप जाधव यांच्याकडून माहिती घेतली. यावेळी जाधव यांनी कल्याण-अंबरनाथ रस्ता तसेच हनुमान मंदिर परिसरात आवश्यक ड्रेनेज व्यवस्था विकसित करण्यात आल्याची माहिती दिली.
आमदार आयलानी यांनी डॉल्फिन रोडवरील दुभाजकांना पुन्हा रंग देण्याचे तसेच उच्च दर्जाचा एक मिलिमीटर जाडीचा रंग वापरण्याचे निर्देश दिले. याशिवाय पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून रस्त्यांचे सौंदर्य वाढविण्यासह पर्यावरण संवर्धनालाही चालना देण्यावर त्यांनी भर दिला. राधास्वामी परिसरातील रस्ते बांधकाम अद्याप सुरू न झाल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. वाहतूक वळविण्याची प्रक्रिया पूर्ण होताच काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन संबंधित कंत्राटदाराने दिले.
दरम्यान, नगररचना विभागाच्या अधिकाऱ्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून विविध चौकांच्या बांधकाम व सुशोभीकरणासाठी आवश्यक मार्किंगबाबत माहिती घेतली. पुढील आठवड्यापर्यंत हे काम पूर्ण होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. शहरातील प्रमुख चौकांची कामे प्राधान्याने पूर्ण करून त्यांचे आकर्षक सुशोभीकरण करण्याचे निर्देशही आमदारांनी दिले. बैठकीच्या शेवटी राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या शहर अभियंत्यांना रस्ते प्रकल्पांवर नियमित देखरेख ठेवून गुणवत्ता तपासणी सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले.
यावेळी शहर अभियंता निलेश शिरसाटे, अभियंता संदीप जाधव, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, वाहतूक विभागाचे नाना आव्हाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशांत मानकर, अनिल पाटील तसेच कल्याण-अंबरनाथ रस्ता प्रकल्पाशी संबंधित कंत्राटदार उपस्थित होते.
