कल्याण : यंदाच्या वर्षी अल निनो आणि आयओडी यांच्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसाठ्याचे ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत नियोजनासाठी दररोज २० टक्के पाणी कपात करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत. याअनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनेही शहरातील बारावे, मोहिली आणि नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रांमधून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून १२ जूनपासून बारावे, मोहिली आणि नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रांतून पाणीपुरवठा होणाऱ्या प्रभाग क्षेत्रामध्ये टप्प्याटप्याने २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. रात्री 12 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत हा पाणी पुरवठा बंद असणार आहे.
पावसाळा उशिरा सुरू होण्याची शक्यता आणि जलसाठ्यावरील वाढता ताण लक्षात घेता ही उपाययोजना आवश्यक ठरली आहे. भविष्यात शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असून पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
०००००००००००
