– पालिकेच्या निष्काळजीपणाविरोधात जल अभियंत्यांकडे धाव
डोंगराळ भागातील नागरिकांचा संताप उफाळला!
मुंबई : भांडुप विधानसभा क्षेत्रात पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, विशेषतः डोंगराळ भागातील रहिवाशांना अपुऱ्या व कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याचा मोठा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी नळांना अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने ते डोंगराळ भागात पोहोचत नाही. परिणामी नागरिकांना पिण्याचे व दैनंदिन वापराचे पाणी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून पालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधात नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर भांडुपमधील पाणीपुरवठा व प्रभागातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज वरळी येथे जल अभियंता दिलीप पाटील यांच्या दालनात संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला नगरसेवक सुरेश शिंदे, नगरसेविका दिपमाला बडे, राजोल संजय पाटील, शाखाप्रमुख राजेश कदम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत भांडुपमधील डोंगराळ भागात पाणी पुरेशा दाबाने पोहोचत नसल्याचा मुद्दा अत्यंत ठामपणे मांडण्यात आला. अनेक वर्षांपासून नागरिक या समस्येला सामोरे जात असताना पालिका प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची खंत उपस्थितांनी व्यक्त केली. विशेषतः उंच भागातील वस्त्यांमध्ये नळांना पाणीच न येणे किंवा अत्यल्प दाबाने येणे ही बाब प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे द्योतक असल्याचा आरोप करण्यात आला. लोकप्रतिनिधींनी जल अभियंत्यांकडे डोंगराळ भागात पाणी वरपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र पंपिंग व्यवस्था, जलवाहिन्यांचे सक्षमीकरण तसेच कमी दाबाच्या भागांसाठी विशेष तांत्रिक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी केली. तसेच खालच्या भागातही जास्तीत जास्त आणि नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याची आवश्यकता असल्याचे प्रभाग क्र. ११४ च्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, भांडुपकरांना मूलभूत गरज असलेल्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना पालिका प्रशासन मात्र केवळ बैठका व आश्वासनांपुरतेच मर्यादित राहिल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. उन्हाळ्यात आणि वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. बैठकीत नागरिकांच्या पाणीप्रश्नावर तातडीने कार्यवाही करून डोंगराळ भागातील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. आता पालिका प्रशासन प्रत्यक्ष कृती करून भांडुपकरांचा पाणीप्रश्न सोडवते की पुन्हा एकदा आश्वासनांचीच मालिका सुरू राहते, याकडे संपूर्ण भांडुपकरांचे लक्ष लागले आहे.
