रिपाइं अध्यक्ष हिरामण गायकवाड यांचा आमरण उपोषणाचा इशारा !
अशोक गायकवाड
रायगड-कर्जत : कर्जत तालुक्यातील किरवली गावातून अवजड वाहनांद्वारे सुरू असलेल्या कथित अनधिकृत डबर व खडी वाहतुकीविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण रघुनाथ गायकवाड यांनी कर्जत महसूल उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, रेल्वे बोगद्याच्या कामादरम्यान ठेकेदारांनी किरवली परिसरातील काही जागा भाडेतत्त्वावर घेऊन बोगद्यातून निघालेला डबर साठवून ठेवला होता. संबंधित ठेकेदार व जागामालक यांच्यातील करार संपुष्टात आल्याचे सांगितले जात असतानाही गेल्या सात ते आठ महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात डबराची वाहतूक सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिरामण गायकवाड यांनी सांगितले की, या संदर्भात किरवली सजाचे तलाठी व सर्कल अधिकाऱ्यांना अनेक वेळा दूरध्वनीद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून माहिती देण्यात आली होती. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गावातील रस्त्यांवरून ४ ते ८ ब्रास क्षमतेचे डंपर दिवस-रात्र धावत असल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच मार्गालगत जिल्हा परिषद शाळा तसेच बौद्ध वस्ती असल्याने विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या अवजड वाहनांमुळे गावातील नुकत्याच तयार झालेल्या रस्त्यांचे नुकसान होत असून, वाहतूक आणि ध्वनीप्रदूषणामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित वाहनांकडून आवश्यक महसूल भरला जात नसल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये असल्याचेही गायकवाड यांनी म्हटले आहे. कर्जत महसूल उपविभागीय अधिकारी व तहसीलदार प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांकडून नियमानुसार महसूल वसूल करावा, अनधिकृत वाहतूक आढळल्यास संबंधित डंपर मालकांवर कायदेशीर कारवाई करावी आणि गावातील रस्त्यावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात तातडीने उपाययोजना न झाल्यास संविधानिक मार्गाने आमरण उपोषण करण्याचा इशाराही हिरामण गायकवाड यांनी प्रशासनाला दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी रायगड, प्रांताधिकारी कर्जत, पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ), बांधकाम विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
