चार ठिकाणी दूध संकलन केंद्र, प्रक्रिया केंद्रांवर छापे
हरिभाऊ लाखे
नाशिक: अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांची आक्रमक आणि रोखठोक शैली विशेष चर्चेत आली आहे. संपूर्ण राज्यात त्यांनी अन्नातील भेसळीविरोधात रान उठविले असून नाशिक जिल्हाही त्यास अपवाद नाही. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सिन्नर तालुक्यातील चार गावांमध्ये दूध भेसळीच्या संशयावरून छापे टाकले. शनिवारी दिवसभर ही कारवाई सुरु होती. या छाप्यांमध्ये भेसळीसाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आल्याची माहिती पुढे आली असून, रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात येत होती. सिन्नर तालुक्यात दूध भेसळीविरोधात झालेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी ठिकठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सिन्नर तालक्यातील शहा, कारवाडी, पुतळेवाडी आणि विघनवाडी येथील दूध संकलन केंद्रे आणि प्रक्रिया केंदांवर छापे टाकले. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मंगेश माने यांच्या नेतृत्वाखाली हे छापे टाकण्यात आले.
कारवाईपूर्वी सकाळपासून विभागातील १२ अधिकाऱ्यांच्या पथकाने छापे टाकण्यात येणाऱ्या केंद्रांवर गुप्तपणे लक्ष ठेवले होते. खात्री झाल्यानंतर स्वतंत्र पथकांव्दारे एकाचवेळी छापे टाकण्यात आले. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये पावडर किंवा इतर कोणत्या पदार्थांची भेसळ होत आहे काय, याची तपासणी करण्यात आली. या छाप्यांदरम्यान नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे तसेच काही साहित्यही जप्त करम्यात आल्याचे सांगितले जाते.यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली नाही. खबरदारी म्हणून छाप्यांवेळी वावी पोलीस ठाण्याकडून पोलीस बंदोबस्तही घेण्यात आला होता.
शहा गावात छापा टाकण्यात आल्याची माहिती मिळताच किराणा दुकाने, पानटपऱ्या, खाद्यपदार्थांची दुकाने पटापट बंद झाली. ती सायंकाळपर्यंत बंदच राहिली. गोदामांचीही झडती घेण्यात आली. शहा येथील दोन, कारवाडी आणि विघनवाडी येथील प्रत्येकी एका दूध संकलन व प्रक्रिया केंद्रावर छापे टाकण्यात आले.
दरम्यान, याआधी दोन दिवसांपूर्वी नाशिक विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथील हॉटेल आणि खाद्यगृहांची तपासणी करण्यात आली. त्यात नऊ हॉटेलांचे परवाने निलंबित करण्यात आले. तर आवश्यक नोंदणी व परवाना नसल्याने चार हॉटेलांना व्यवसायास प्रतिबंध करण्यात आला. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने नाशिक विभागात दोन दिवसात २० हॉटेलांची तपासणी करण्यात आली. अन्न व सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हाॅटेलांवर कारवाई करण्यात आली.
तपासणी दरम्यान स्वयंपाकगृहातील गंभीर अस्वच्छता, निकृष्ट दर्जाची शीतकरण यंत्रणा, अस्वच्छतेत उघड्यावर ठेवलेले कच्चे अन्न, कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव तसेच संबंधित आस्थापनांकडे आवश्यक कागदपत्रांचा अभाव, कार्यरत कर्मचाऱ्यांची कुठलीही वैद्यकीय तपासणी न करणे तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम आणि त्या अंतर्गत विविध नियम व विनियमांचे उल्लंघन या कारणावरून संबंधित हॉटेल आणि आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले. यात नाशिक जिल्ह्यातील चार, जळगाव येथील दोन तर नंदुरबार येथील एका हॉटेलचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *