दिवा : शिवसेना दिवा युवतीसेना आयोजित इयत्ता दहावी व बारावीतील यशस्वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव सोहळा’ मोठ्या उत्साहात कल पार पडला. हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केला असतानाही विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने सेंट मेरी शाळेतील हॉल मध्ये आपली उपस्थित दर्शवीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रसंगी दिवा शहरातील ४२ शाळा आणि कॉलेजेस मधील जवळपास ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी, पालक तसेच विविध शाळांतील संचालक व मुख्याध्यापक उपस्थित होते. प्रसंगी इयत्ता १२ वी मध्ये दिवा शहरात प्रथम येणाऱ्या श्वेता शिंदेसह इयत्ता १० वी मध्ये दिवा शहरात यश घाणेकर ९३% गुण मिळवले असून इयत्ता १० वी मध्ये ७०% पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या शेकडो यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला.
गुणगौरव सदर सोहळ्या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक असलेले शहरप्रमुख रमाकांत मढवी यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “करिअरमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या पालकांच्या कष्टांचे मोल ओळखा. आयुष्यात मोठे ध्येय गाठण्याचा निर्धार करा आणि त्यासाठी सातत्याने मेहनत घ्या.” मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेक विद्यार्थी दिशाहीन होत असल्याची खंत देखील व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले. तसेच नगरसेविका साक्षी मढवी, नगरसेवक शैलेश पाटील व आदेश भगत यांनी देखील मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेत वाढ केल्याची घोषणा रमाकांत मढवी यांच्या तर्फे करण्यात आली. तसेच दिवा परिसरात लवकरच अभ्यासिका (स्टडी रूम) सुरू करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली. “शिवसेना कायम विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व करिअरच्या वाटचालीस शुभेच्छा देत कार्यक्रमाचा समारोप झाला.
प्रसंगी दिवा शहर प्रमुख तथा नगरसेवक रमाकांत मढवी, नगरसेवक शैलेश पाटील, ऍड. आदेश भगत, दीपक जाधव तसेच नगरसेविका साक्षी मढवी, स्नेहा पाटील, दर्शना म्हात्रे तसेच भालचंद्र भगत, उमेश भगत, विनोद मढवी, चरणदास म्हात्रे, शशिकांत पाटील, जगदीश भंडारी, गुरुनाथ पाटील, सचिन चौबे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
