रेल्वे व केडीएमसी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी; तातडीने रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट केलेल्या मौजे उसरघर गावातील नागरिक मागील काही महिन्यांपासून गावात जाण्याकरिता रेल्वे मोरीतून तसेच उड्डाणपुलावरून थेट पोहोच रस्ताच नसल्यामुळे रेल्वे केडीएमसी प्रशासना विरोधात आक्रमक झाले आहेत.
उसरघर गावाच्या हद्दीलगत केंद्र शासनाच्या डीएफसीसी आयएल ( डेडिकेटेड फ्रेट रेल्वे कॉरिडोर ) या मालवाहू रेल्वे खालून ग्रामस्थांना येजा करण्याकरिता भुयारी मार्ग बनवण्यात आला आहे. परंतु या भुयारी मार्गात उन्हाळ्यामध्ये सुद्धा चार फूट पाणी साचलेला असतो आणि आता पावसात तर हा भुयारी मार्ग पूर्ण तुडुंब भरलेला आहे त्यामुळे या भुयारी मार्गातून येथील नागरिकांना येजा करता येत नसल्यामुळे अर्धा तास पायपीट करून रेल्वेच्या उड्डाण पुलावरून गावात प्रवेश करावा लागतो. तसेच याच रेल्वे मार्गालगत मध्य रेल्वेचे वसई कोपर पनवेल रेल्वेचे सुद्धा दोन मार्ग प्रस्तावित असून मध्य रेल्वेने तर भुयारी मार्गच अजून बनवलेला नाही.परंतु या दोन्ही भुयारी मार्गातून येजा करण्याकरिता रेल्वे रेल्वेच्या हद्दीपासून गावाच्या मुख्या रस्त्याला जोडण्याकरिता पोहोच रस्ता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सुद्धा अजून बनवून दिलेला नाही.
याच रेल्वे प्रशासनाने मानपाडा ते दिवा या रस्त्यातील उसरघर गावाच्या हद्दीत उड्डाण पुलाचे अलाइनमेंट चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे या उड्डाण पुलावरून खाली उतरल्यानंतर या गावातील नागरिकांना आपली वाहने वळवताना खूप कसरत करावी लागत. कधी कधी तर पाठीमागून येणारे वाहने सुद्धा एकमेकांना धडकत आहेत. शाळेच्या बसला तर अर्धा किलोमीटर पुढे जाऊन यूटर्न मारून यावं लागत आहे.
मुळात इतिहास असा आहे की 1970 च्या दशकामध्ये प्रीमियर कंपनी या चार चाकी वाहन निर्मिती कारखान्याच्या स्थापनेनंतर कंपनी व्यवस्थापनाने कारखान्याच्या सिमेलगतच पंचक्रोशीतील नागरिकांसाठी मानपाडा-संदप-उसरघर रस्त्याचे प्रयोजन करून दिले होते. हाच रस्ता थेट पुढे दिव्यातून ठाण्यापर्यंत जातो.या रस्त्याचे जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निधीने आज पर्यंत देखभाल दुरुस्ती करण्यात आली. एप्रिल 2018 मध्ये माय सिटी या प्रकल्पालगत येथील बांधकाम व्यवसायिकाने स्थानिक प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता वापरात असलेल्या अस्तित्वातील रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून भिंत घालण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलन करून हा खोदलेला रस्ता पुन्हा बुजवून पूर्वत केला होता.
‘ज्याप्रमाणे केंद्र शासनाच्या डीएफसीसीआयएल या मालवाहू रेल्वे प्रशासनाने उसरघर ग्रामस्थांकरिता भुयारी मार्ग बनवला आहे. तशाच प्रकारचा भुयारी मार्ग मध्य रेल्वेने सुद्धा तातडीने बनवून द्यावा. पुढे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने गावापर्यंतचा अर्धवट असलेल्या रस्ता पूर्ववत करून द्यावा. तसेच चुकीच्या पद्धतीने अलाइनमेंट करून तयार करण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे योग्य पद्धतीने अलाइनमेंट करून ग्रामस्थांकरिता थेट गावात प्रवेश करता येईल असा रस्ता तयार करून द्यावा. अन्यथा हे चुकीच्या पद्धतीने अलाइनमेंट केलेल्या उड्डाणपुलामुळे उरलेली जागा बिल्डरला मिळावी याकरीता अधिकाऱ्यांनी केलेले हे संगणमत समजण्यात येईल आणि त्यांच्या विरोधात उग्र आंदोलन छेडण्यात येईल’, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांनी दिला आहे.
