पर्जन्य जल संचायनाचे विविध प्रकल्प
कल्याण : जलसंवर्धन ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. वाढते शहरीकरण आणि बदलते हवामान यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागात पाण्याची टंचाई दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून वर्षा जल संचयन ही काळाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ कल्याण, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांच्या पुढाकारातून शहरी भागात आणि ब्लॉसम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागात प्रत्येकी एक अशा दोन वर्षा जल संचयन प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे.
शास्त्रीनगर सिव्हिल हॉस्पिटल व मीनाताई ठाकरे उद्यान डोंबिवली पश्चिम येथे वर्षा जल संचयन प्रकल्प यशस्वीपणे साकारण्यात आला आहे. तसेच, शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, मानेखिंड येथे रोटरी क्लब ऑफ कल्याण आणि ब्लॉसम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने उपक्रम राबविण्यात आला आहे. अध्यक्षा रो. रुईता सपकाळे, सचिव जय राठोड, प्रकल्प प्रमुख आत्माराम घाणेकर आणि सह-प्रकल्प प्रमुख वैशाली परदेशी यांच्या नेतृत्वाखाली हे दोन्ही प्रकल्प राबवण्यात आले. या प्रकल्पांमुळे दरवर्षी लाखो लिटर पावसाचे पाणी भूगर्भात पुनर्भरण होणार असून, त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास, भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यास आणि पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे.
या प्रकल्पांतर्गत शास्त्रीनगर सिव्हिल हॉस्पिटल आणि मीनाताई ठाकरे उद्यान, डोंबिवली (पश्चिम) येथील इमारतींच्या छतावर पडणारे दरवर्षी सुमारे ३ लाख १५ हजार लिटर पावसाचे पाणी भूगर्भात रिचार्ज केले जाणार आहे. तसेच, शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, मानेखिंड येथील शाळेच्या इमारतीच्या छतावर पडणारे दरवर्षी सुमारे २ लाख ७० हजार लिटर पावसाचे पाणी भूगर्भात रिचार्ज केले जाणार आहे. हे पाणी अत्याधुनिक फिल्टर प्रणालीद्वारे शुद्ध करून आवश्यकतेनुसार वापरासाठी साठवले जाणार असून, अतिरिक्त पाणी भूगर्भात पुनर्भरण करण्यात येणार आहे.
या दोन्ही प्रकल्पांमुळे पावसाच्या पाण्याचा प्रभावी व शाश्वत वापर होणार असून, भूजल पातळी वाढण्यास व भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यास मोलाची मदत होणार आहे. विशेषतः मानेखिंड गावातील जलसुरक्षेला बळकटी मिळून स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा दीर्घकालीन लाभ होणार आहे.
शास्त्रीनगर सिव्हिल हॉस्पिटल आणि मीनाताई ठाकरे उद्यान डोंबिवली पश्चिम पर्जन्य जलसंचयन या प्रकल्पाचे उद्घाटन नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याहस्ते करण्यात आले. डिस्ट्रिक्ट वॉटर अँड सॅनिटेशन सल्लागार हेमंत जगताप तसेच केडीएमसी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांचे मार्गदर्शन लाभले. यांसह रोटरी क्लब ऑफ कल्याणचे दिलीप करडेकर, जयश्री करडेकर, पराग कापसे, घनश्याम गुप्ता, गौरव राय, माधवी कुलकर्णी हे सदस्य देखील उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळा, मानेखिंड वर्षाजल संचयन प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाला माजी जिल्हा गव्हर्नर  मिलिंद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच ब्लॉसम चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अश्विनी रणदिवे, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता चौधरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *