अतिमुसळधार पावसासह ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार
अनिल ठाणेकर
ठाणे : भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड वॉर्निंग जारी केली असून, काही ठिकाणी मध्यम ते अतिमुसळधार पावसासह ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क करण्यात आली असून, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
गेल्या २४ तासांतील मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडे विविध प्रकारच्या एकूण १८६ तक्रारी प्राप्त झाल्या. सर्वाधिक तक्रारी झाडे पडण्याच्या असून, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
प्राप्त तक्रारींमध्ये ११० झाडे पडल्याच्या, ३८ झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या, १४ धोकादायक स्थितीतील झाडांच्या आणि ६ धोकादायक फांद्यांच्या तक्रारींचा समावेश आहे. या घटनांमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र, संबंधित यंत्रणांनी झाडे आणि फांद्या हटवून रस्ते वाहतुकीसाठी खुले केले.
याशिवाय शहरातील सखल भागांमध्ये ४ ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या. तसेच १ पाणीपुरवठा वाहिनी गळती, १ स्लॅब कोसळणे, २ कंपाउंड भिंती कोसळणे, १ धोकादायक स्थितीतील कंपाउंड भिंत, २ मेटल शेड कोसळणे आणि इतर स्वरूपाच्या ७ तक्रारी नियंत्रण कक्षाकडे प्राप्त झाल्या.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने सकाळी १० वाजता जारी केलेल्या ‘नाऊकास्ट’ इशाऱ्यानुसार पुढील तीन तास ठाणे जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचे असून, काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाबरोबरच ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे झाडे उन्मळून पडणे, फलक कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे आणि सखल भागांमध्ये पाणी साचण्याचा धोका वाढू शकतो.
महापालिका प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. धोकादायक झाडे, सैल जाहिरात फलक, कमकुवत भिंती किंवा इतर संभाव्य धोकादायक बाबी आढळल्यास तात्काळ महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. तसेच जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याच्या काळात झाडाखाली किंवा जीर्ण इमारतींच्या परिसरात थांबणे टाळावे, सुरक्षित ठिकाणी राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट
इंद्रायणीला पूर; आळंदीकडे येऊ नका ! प्रशासनाचे वारकरी व भाविकांना आवाहन
आषाढी वारी २०२६ निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीत दाखल होत असतानाच, मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला आहे. नदीवरील आळंदी शहरात प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली गेल्याने शहरात येणे सध्या सुरक्षित नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.प्रशासनाने सर्व वारकरी, भाविक आणि नागरिकांना तातडीचे आवाहन करत सांगितले आहे की, ज्या वारकऱ्यांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे त्यांनी सध्या ज्या ठिकाणी आहेत तेथेच सुरक्षित थांबावे. कोणत्याही परिस्थितीत आळंदीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नये.
