दिवा : मुसळधार पावसामुळे शिळगाव स्मशानभूमी परिसरात निर्माण झालेल्या पाणी तुंबण्याच्या समस्येची नगरसेविका वेदिका साहिल पाटील यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यामुळे नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीची आणि शिळगावात अन्य ठिकाणी साचणाऱ्या पाण्याची दखल घेत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
नागरिकांनी स्मशानभूमीत अंत्ययात्रा गुडघाभर पाण्यातून न्यावी लागत असल्याची तक्रार केल्यानंतर नगरसेविका पाटील यांनी परिस्थितीची पाहणी केली. पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी आवश्यक गटार उभारण्याबाबत स्मशानभूमीलगतचे जमीनधारक रोहिदास फौजदार आणि रत्ना फौजदार यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित जमीनधारकांनी गटार बांधण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शविली.
तसेच, पाणी निचऱ्यात अडथळा ठरत असलेल्या काही गाळेधारकांना गाळे दोन फूट मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले. यानंतर नगरसेविका पाटील यांनी शिळगावातील हनुमान मंदिर, महाकालेश्वर मंदिर आणि तुळजाभवानी मंदिर परिसराची पाहणी करून स्वच्छता, नालेसफाई आणि पाणी साचणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. या पाहणी दौऱ्यात भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष (प्रकोष्ठ) अभियंता साहिल पाटील, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळाराम पाटील, शिवसेना युवा सेनेचे दिवा शहर उपाध्यक्ष वैभव आलिमकर, मनसेचे शिळ विभाग अध्यक्ष शरद पाटील, शाखाध्यक्ष प्रशांत भोईर तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नगरसेविका वेदिका पाटील यांनी शिळगावातील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, महानगरपालिकेने दिलेल्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान, पाहणीनंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, प्रत्यक्ष कामाला किती लवकर सुरुवात होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
००००००००
