कुंभमेळ्याच्या खोदकामांचा फटका
हरिभाऊ लाखे
नाशिक : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने एकाचवेळी हाती घेतलेल्या २८ प्रमुख रस्त्यांच्या कामांसह जलवाहिन्या, गॅस वाहिन्या, पावसाळी गटारे आदींसाठी करण्यात आलेल्या चौफेर खोदकामांचा फटका बुधवारी शहराला बसला. २४ तासांत १२० मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर नाशिक जलमय झाले. अनेक प्रमुख रस्ते आणि चौक पाण्याखाली गेले, तर सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी खड्ड्यांत वाहने अडकून अपघातांची मालिका घडली. यामध्ये शालेय वाहने, महापालिकेच्या सिटीलिंक बस आणि घंटागाडीचाही समावेश होता. दुचाकीस्वारांसाठी तर या खोदकामांमधून सुरक्षितपणे मार्ग काढणे मोठे आव्हान ठरले. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर नागरिकांकडून सडकून टीका होत आहे.
मंगळवारी ढगफुटीचा धोका टळल्याचा दिलासा मिळत नाही तोच बुधवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने शहराला झोडपले. मागील २४ तासांत १२० मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. रात्रभर झालेल्या पावसामुळे रस्ते आणि निवासी भाग जलमय झाले. नंदिनी नदीवरील काही पूल पाण्याखाली गेले, तर अनेक दुकाने आणि इमारतींच्या वाहनतळांत पाणी शिरले.
नाशिकला यापूर्वीही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मात्र यावेळची परिस्थिती वेगळी होती. रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहत असतानाच सर्वत्र सुरू असलेल्या खोदकामांमुळे वाहनधारक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी खोदलेले रस्ते अर्धवट बुजविण्यात आले असून, काही ठिकाणी एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू असल्याने धोका अधिक वाढला.
कुंभमेळ्यासाठी शासनाने सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे नियोजन केले आहे. वेळ कमी असल्याचे कारण देत महापालिकेने रस्ते, पूल, जलवाहिन्या आणि सांडपाणी वाहिन्या अशी अनेक कामे एकाचवेळी सुरू केली. परिणामी शहरातील अनेक रस्ते अक्षरशः मृत्यूचे सापळे बनल्याचे चित्र दिसून आले.
खोदकाम झालेल्या ठिकाणी दगड आणि मुरूम टाकून तात्पुरते समतलीकरण करण्यात आले होते. मात्र मुसळधार पावसामुळे ही मलमपट्टी वाहून गेली आणि अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले. रस्त्यांवर खडी, चिखल आणि माती पसरल्याने वाहतूक धोकादायक बनली. गंगापूर रस्त्यावर शालेय वाहने आणि सिटीलिंक बस खड्ड्यात अडकल्या. मुसळधार पावसात घडलेल्या या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले. उपमहापौर विलास शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधत त्यांना घरी पोहोचविण्याची व्यवस्था केली. ज्ञानेश्वरनगर येथील आव्हाड पेट्रोल पंपासमोर रस्ता खचल्याने अवजड मालवाहू ट्रक अडकला, तर रामवाडी परिसरात महापालिकेची घंटागाडी खड्ड्यात रुतली.
वाहतूक कोंडी, अपघातांना निमंत्रण
रस्ते जलमय आणि खड्डेमय झाल्यामुळे शहरभर वाहतूक कोंडी झाली. ज्या भागांत कुंभमेळ्याची कामे सुरू आहेत, त्या ठिकाणी वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला. खोदकामांमुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा अडथळला. तात्पुरते बुजवलेले भाग पाण्याखाली गेल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. परिणामी अनेक ठिकाणी लहान-मोठे अपघात घडले, तर चारचाकी आणि दुचाकी वाहने पाण्यात बंद पडली. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शहराच्या कानाकोपऱ्यात बसल्याने पावसाळ्यात निर्माण झालेल्या या संकटासाठी महापालिकाच जबाबदार असल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *