अनिल ठाणेकर
ठाणे: ठाणे शहर व जिल्ह्यात ठिकठिकाणी २०० हून अधिक लॉटरी दुकानांमधून कोणत्याही राज्य सरकारची मान्यता नसलेली बेकायदा लॉटरी सुरू आहे. मुंब्रा येथील एका व्यक्तीकडून संपूर्ण नेटवर्क सुरू असून, दोन आकडी क्रमांकावर पाच रुपयांपासून एक हजार रुपयांची लॉटरी घेतली जात आहे. या प्रकाराकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत असून, राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बूडत आहे. तर सामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे. या प्रकाराकडे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले असून, बेकायदा लॉटरीचे जाळे बंद करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी तत्काळ कारवाई न केल्यास ठाणे जिल्ह्यात नवे लॉटरी माफिया उदयाला येण्याची भीती संजय वाघुले यांनी व्यक्त केली आहे.

नशीबाच्या हवाल्याने श्रीमंतीची स्वप्न पाहणारा सामान्य नागरिकांचा मोठा वर्ग आहे. दररोज अंगमेहनतीने रोजीरोटी कमाविणाऱ्या या वर्गात अल्पशिक्षितांची संख्या मोठी आहे. अशा वर्गाला टार्गेट करीत ठाणे शहरातील स्टेशन रोड, नौपाडा, गोकुळनगर, कळवा आदी भागाबरोबरच कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर शहरात अंदाजे २०० हून अधिक बेकायदा लॉटरीची दुकाने सुरू झाली आहेत. शहरातील वर्दळीच्या मुख्य रस्त्यांलगत छोटा गाळा घेऊन लॉटरीचे दुकान उघडले जाते. या दुकानाला पडदा लावून लॉटरी विक्री केली जाते. भारतात अस्तित्वात नसलेल्या लॉटरीचे नाव दिले जाते. अनेक वेळा ईशान्येकडील एखाद्या राज्याच्या नावे लॉटरी जाहीर केली जाते. विशेषत: पाच रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत तिकीट असल्यामुळे गरीब नागरिकांबरोबर मध्यमवर्गीयांचीही गर्दी होत आहे. १० ते ९९ यामधील दोन आकड्यांच्या या लॉटरीत १०० रुपयांचे तिकीट काढल्यास ८०० रुपये बक्षीस दिले जाते. मात्र, लॉटरीचे प्रत्यक्षात तिकीट नव्हे तर एका छोट्या कागदावर आकड्याची नोंद केली जाते. तो कागद ग्राहकाला दिला जातो. त्यानंतर या पावत्यांची नोंद संगणकात केली जाते. मात्र, ज्या कोणत्या दोन आकड्यावर कमी रक्कम लावलेली असेल, त्या आकड्याला बक्षीस दिले जाते. त्यामुळे या प्रकारात ग्राहकांची १०० टक्के फसवणूक होत आहे, याकडे नगरसेवक संजय वाघुले यांनी लक्ष वेधले आहे.

देशभरात झटपट (इन्स्टंट) लॉटरीला पूर्णत: बंदी आहे. मात्र, बेकायदा लॉटरी विक्रीच्या दुकानांमध्ये झटपट लॉटरीचीही सर्वाधिक विक्री होत आहे. कोड खोडल्यानंतर लगेच निकाल लागत असल्यामुळे त्याला ग्राहकांचा प्रतिसाद मिळतो. मात्र, त्यात मोठे बक्षीस न देता किरकोळ बक्षीसे देऊन ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. मुंब्रा येथील महंमद नावाच्या व्यक्तीकडून ही बेकायदा लॉटरी सुरू करण्यात आली आहे. साधारणत: एका दुकानात आठवड्याचा ५० हजार रुपयांची विक्री गृहीत धरल्यास, ठाणे जिल्ह्यातील २०० दुकानांमधून आठवड्याला एक कोटी रुपये जमा होत आहेत. तर महिनाभरात जमा होणाऱ्या ४ कोटी रुपयांहून अधिक रकमेची ग्राहकांची फसवणूक होत आहे. या लॉटरीतून दररोज शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत, असे नगरसेवक संजय वाघुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

०००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *