२९५ अधिकाऱ्यांवर जबाबदारी!
अनिल ठाणेकर
ठाणे-नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या सुमारे ५ हजार अनधिकृत इमारतींच्या प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या अनधिकृत बांधकामांसाठी महापालिकेचे २९५ अधिकारी जबाबदार असल्याचा दावा करण्यात आला असून, आयुक्तांनी केलेल्या वक्तव्यामुळे महापालिका वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणात महापालिकेच्या २९५ अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जात असताना, तत्कालीन आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या भूमिकेबाबत कोणतीही स्पष्ट जबाबदारी निश्चित करण्यात आलेली नसल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, कामगार संघटनांनी या प्रकरणात तीव्र आक्षेप नोंदवला आहे. केवळ कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करून वरिष्ठ प्रशासनाला जबाबदारीतून मुक्त करता येणार नाही, असा आरोप संघटनांनी केला आहे. अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात उभी राहत असताना त्याकडे वरिष्ठ प्रशासनाने दुर्लक्ष केले का, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. कामगार संघटनांच्या मते, अशा प्रकारची मोठ्या प्रमाणावरील अनधिकृत बांधकामे स्थानिक प्रशासनाच्या माहितीशिवाय होणे शक्य नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आयुक्त, अतिरिक्त आयुक्त तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच काही राजकीय नेते, माजी नगरसेवक आणि भूमाफियांना अभय दिल्याचा आरोपही करण्यात आला असून, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन या आरोपांवर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
