सिंधुदुर्ग: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या निर्देशांनुसार ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’ कार्यक्रमाला आज दोडामार्गातून सुरुवात झाली. या कार्यक्रमात सहभागी होत दोडामार्गवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अयोध्या येथील मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या मंदिरातील दान पेटी मध्ये लूट करणाऱ्या लबाड लोकांना सुबुद्धी द्यावी याहेतूने प्रदेश काँग्रेसच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळी दोडामार्ग शहरातून या अनोख्या सत्याग्रह कार्यक्रमास सुरवात झाली. भजन, रामकथावाचन, पसायदान आदींचा समावेश असलेला हा सत्याग्रह कार्यक्रम येत्या मंगळवार १४ जुलै पर्यत संपूर्ण जिल्ह्याभरात करण्यात येणार आहे.
दोडामार्ग येथील हनुमान मंदिरात हनुमानाचे दर्शन घेऊन त्यानंतर गणेश मंदिरात गणेशाचे दर्शन घेऊन या अनोख्या सत्याग्रह कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी’ रघुपती राघव राजाराम’ या कडव्यावर आधारित भजन म्हणत, टाळ – मृदूंग, हार्मोनियम वाजवत मर्यादा पुरुषोत्तम राम नामाचा जयघोष करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव नाईक, जिल्हा सचिव सुभाष दळवी, तालुकाध्यक्ष बाबू गवस, सेवादल जिल्हाध्यक्ष अजिंक्य गावडे, जेम्स फर्नांडिस, सुधीर aगवस, सोनू गवस, सुधीर चांदेरकर, दीनानाथ उगवेकर, मोहन गवस, विजय हेरेकर, देवानंद हजारें, श्रीकृष्ण गवस, मदन सावंत, संदीप नाईक, तुकाराम नाईक व इतर कार्यकर्ते तसेच रामभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
