कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी आमदार सुलभा गायकवाड यांची ५० कोटींच्या विशेष निधीची मागणी
कल्याण : कल्याण पूर्व व कल्याण पश्चिम शहरांना पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी उल्हास नदीपात्रात फुटल्याने लाखो नागरिकांना सलग दोन दिवस पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागल्याच्या पार्श्वभूमीवर कल्याणचा गंभीर पाणीप्रश्न महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन २०२६ मध्ये उपस्थित करण्यात आला. ही घटना केवळ तांत्रिक बिघाड नसून नागरिकांच्या मूलभूत हक्काशी संबंधित अत्यंत गंभीर बाब असल्याचे अधोरेखित करत शासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाच्या आमदार सुलभा गायकवाड यांनी विधानसभेत लक्षवेधी द्वारे केली आहे.
सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी टाकण्यात आलेली ही मुख्य जलवाहिनी आता पूर्णपणे जीर्ण झाली असून, दरवर्षी पावसाळ्यात अशाच प्रकारच्या दुर्घटना घडण्याची शक्यता कायम असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. वारंवार तात्पुरत्या दुरुस्त्या करून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी त्यातून नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा मिळत नसल्याचेही नमूद करण्यात आले.
याच पार्श्वभूमीवर विधानसभा पावसाळी अधिवेशनात “पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन” द्वारे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. उल्हास नदीपात्रातून जाणाऱ्या विद्यमान जलवाहिनीऐवजी सुरक्षित सिमेंट काँक्रीट पुलावरून नवीन मुख्य जलवाहिनी उभारण्यात यावी. तसेच आपत्कालीन परिस्थितीत पाणीपुरवठा खंडित होऊ नये यासाठी स्वतंत्र स्टँडबाय जलवाहिनीही उभारण्यात यावी, यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला ५० कोटींचा विशेष निधी तात्काळ मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी पिण्याचे पाणी हा राजकारणाचा विषय नसून प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. भविष्यात लाखो कल्याणकरांना वारंवार पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी शासनाने दीर्घकालीन आणि शाश्वत उपाययोजना राबविण्याची आवश्यकता असल्याचेही सुलभा गायकवाड यांनी आपल्या निवेदनात सांगितले. दरम्यान, शासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन आवश्यक निधी मंजूर करावा आणि कल्याण शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *