‘दोन जन्मात अंतर, कुटुंब सुदृढ निरंतर’ या घोषवाक्यावर जनजागृती अभियान
कल्याण : कल्याण-बिवली महानगरपालिका हद्दीत ११ ते १८ जुलै या कालावधीत ‘जागतिक लोकसंख्या दिन’ सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यावर्षीच्या अभियानाची घोषणा “दोन जन्मात अंतर, कुटुंब सुदृढ निरंतर” अशी आहे. या अभियानाअंतर्गत कुटुंब नियोजन, माता व बाल आरोग्य तसेच संतुलित लोकसंख्या वाढ याबाबत व्यापक जनजागृती केली जाणार आहे.
केडीएमसीच्या वैद्यकीय व आरोग्य विभागामार्फत महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरी आरोग्य केंद्रे आणि मनपा रुग्णालयांमध्ये विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. कुटुंब नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विशेष समुपदेशन कक्ष सुरू करण्यात आले असून, लाभार्थ्यांची गोपनीयता राखत आधुनिक गर्भनिरोधक साधने, आपत्कालीन गर्भनिरोधक तसेच कायमस्वरूपी व तात्पुरत्या कुटुंब नियोजनाच्या उपाययोजनांची माहिती आणि सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
महानगरपालिका प्रशासनाने सांगितले की, वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि नैसर्गिक संसाधनांवर ताण वाढत आहे. त्यामुळे कुटुंब नियोजन हे केवळ अनिच्छित गर्भधारणा टाळण्यासाठीच नव्हे, तर माता व नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि कुटुंबाचा जीवनमान उंचावण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘जागतिक लोकसंख्या दिन’ सप्ताहादरम्यान आयोजित कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा आणि संतुलित लोकसंख्या वाढ व सुदृढ कुटुंबाच्या संकल्पाला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन  केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी दीपा शुक्ला यांनी केले आहे.
0000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *