मुरबाडकर तहानले, आमदार गप्प! राष्ट्रवादीचा ८ दिवसांचा अल्टिमेटम
राजीव चंदने
मुरबाड : गेल्या एक महिन्यापासून मुरबाड शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पावसाळा सुरू होऊनही आणि शिरवली धरणात ७०% पाणी साठा असूनही प्रशासन पाणीपुरवठा सुरळीत करू शकले नाही. या निष्क्रियतेविरोधात,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार,(गट) मुरबाड तालुक्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिपक अशोक वाघचौडे यांनी तहसीलदार, मुख्याधिकारी,आणि महावितरण यांना निवेदन दिले आहे.
“निवडणुकीत मुरबाड तालुक्याचे भाग्यविधाते म्हंटले जाणारे आमदार किसन कथोरे यांनी २४ तास शुद्ध पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. आज १ महिना झाला तरी दिवसाआड पाणी येते.परंतु नगरपंचायत आणि महावितरण एकमेकांवर खापर फोडत आहेत,” असा आरोप वाघचौडे यांनी यावेळी पत्रात केला आहे,
पुढील ८ दिवसात मुरबाड शहराला दररोज मुबलक व शुद्ध पाणीपुरवठा सुरू न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नगरपंचायत कार्यालयावर महिलांचा मोर्चा काढण्याचा इशारा हि पत्रात देण्यात आला आहे. नगरपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे.
