0000000
अनिल ठाणेकर
ठाणे,जंजिरा किल्ल्यावर कोणी मालकी सांगणार असेल तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ. हे किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे, त्यामुळे सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे आंदोलन सुरूच ठेवून कायमस्वरूपी भगवा झेंडा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला.
जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकविण्यास परवानगी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने गुरुवारी सायन येथील केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्राच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने दुर्गसेवक मुंबईत दाखल झाले होते. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे संवर्धन, स्वच्छता, जतन व ऐतिहासिक वारसा जपण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकविण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे करण्यात आली होती. मात्र ही मागणी विभागाकडून नाकारण्यात आल्याने महाराष्ट्रातील दुर्गसेवक आणि हिंदूप्रिय नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी आपली परखड भूमिका स्पष्ट केली. स्वातंत्र्यानंतर सर्व किल्ले हे देशाच्या मालकीचे झाले आहेत. त्यामुळे कोणी यावर मालकी सांगू नये. अन्यथा जशास तसे उत्तर देऊ. किल्ल्यात कायमस्वरूपी भगवा झेंडा फडकवणे का अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे सह्याद्री प्रतिष्ठान येत्या काळात आणखी तीव्र आंदोलन करेल. आम्ही केंद्रीय पुरातत्व खात्याला विनंती केली असून जोपर्यंत जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा झेंडा फडकत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार श्री. केळकर यांनी व्यक्त केला.
00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *