रमेश औताडे
मुंबई : प्रत्येक वेळी आश्वासन देणाऱ्या सरकारने एकदा सांगून टाकावे की आम्ही अजून किती वर्ष आंदोलन करायचे असा सवाल करत शेतकरी लोकनेते रमेश हिंदुराव यांनी आझाद मैदानात साखळी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. भिवंडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित भ्रष्टाचार चौकशीच्या मागणीसाठी भाई आकाश निर्मळ आणि रमेश हिंदुराव त्यांच्या सहकाऱ्यांनी आझाद मैदानात साखळी उपोषण सुरू केले. उपविभागीय अभियंता दत्तू गीते ३ वर्ष भिंवडी सार्वजनिक बांधकाम उपविभागात सेवा पूर्ण होऊनही त्यांची बदली का झाली नाही.
एक कोटी १७ लाख ७२ हजार ६४८ इतक्या रकमेचे वाढीव बिल काढल्याचा आरोप करत संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. याप्रकरणी निष्पक्ष चौकशी करावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. आझाद मैदानात न्याय मिळणार आहे की फक्त आश्वासनच असा सवाल रमेश हिंदुराव यांनी केला आहे.
